2018 मध्ये आलेल्या 'KGF चॅप्टर 1' चित्रपटाने कन्न्ड सिनेमातील अभिनेता यशला संपूर्ण भारतभर प्रसिद्धी मिळवून दिली. चित्रपटातील पात्रांसह आणि रॉकीच्या भूमिकेतील प्रत्येक सीन, डायलॉगला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. चित्रपटातील एक डायलॉग आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहे. जेव्हा रस्त्यावर आपल्या लहान मुलाला हातात घेऊन महिला संघर्ष करत असते तेव्हा ऱॉकी तिची मदत करतो आणि आपल्या स्टाईलमध्ये म्हणतो की, 'सबसे बडा योद्धा माँ होती है'.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 'KGF चॅप्टर 1' रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक इतक्या आतुरतेने दुसऱ्या भागाची वाट पाहत होते की, भारतीय चित्रपसृष्टीतील चौथा सर्वात मोठा चित्रपट ठरला. आज यश हे नाव भारतीय अभिनेत्यांमधील मोठ्या नावांपैकी आहे. आता यश आगामी 'टॉक्सिक' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक गीतू मोहनदाससोबत काम करत आहे. गितू यांचे पती राजीव स्वत: दिग्दर्शक आहेत. टॉक्सिक चित्रपटासाठी ते डीओपी आहेत. 


यश मोठा अभिनेता असला तरी कॅमेऱ्यामागील कोणीही दिलेली सल्ला, आयडिया घेण्यास तो तयार असतो. एका मुलाखतीत त्याने केजीएफ 1 चित्रपटातील आईच्या सीनची आयडिया प्रोडक्शनशी संबंधित एका व्यक्तीने दिल्याचं सांगितलं. 


आईच्या सीनची कल्पना कशी सुचली?


यशने मुलाखतीत सांगितलं की, "मी आणि प्रशांत (प्रशांत नील, दिग्दर्शक) एकत्र बसून फिल्मचं एडिट पाहत होतो, त्याच्यावर काम करत होतो. पावाचा तो सीन आईसोबत नव्हताच. एका म्हाताऱ्या महिलेसोबत तो सीन होता, जो रस्ता ओलांडत होती. मी फक्त आपली गन काढतो आणि तिथे सीन संपतो. यावेळी आमचे एक्झिक्युटिव्ह प्रो़ड्यूसर रामा राव तिथे बसले होते. ते अचानक उठले आणि म्हणाले, ही चित्रपट रॉकीबद्दल आहे, मग या सीनमध्ये आई का नाही?".


यशने पुढे सांगितलं की, "ही कल्पना भन्नाट असल्याने मी आणि प्रशांत एकमेकांकडे फक्त पाहत राहिलो. मी विचार केला आता काय करायचं? प्रशांत म्हणाला, काही हरकत नाही, मी सगळा ब्लॉकच बदलून टाकतो. आपण हा सीन री-शूट करुयात. यानंतर मी निर्मात्यांना हा सीन बदलावा लागेल सांगत तयार केलं. आम्ही सीनसाठी एका महिलेला लहान मुलासह आणलं. तिला पाहिल्यानंतर रॉकीला त्याची आई आठवते. यानंतर मी गाडीतून  बाहेर पडून तिच्याकडे जातो. येथे आम्हाला एक लाईन हवी होती. चर्चा केल्यानंतर एक लाईन आम्हाला सापडली, ती होती 'सबसे बडा योद्धा माँ होती है'".


तुम्हाला कधी कोणाकडून चांगली आयडिया मिळेल हे सांगता येत नाही असंही यशने यावेळी सांगितलं. आम्ही 2014 पासून चित्रपटावर काम करत आहोत. स्क्रिप्टसाठी 4 ते 5 वर्षं काम करत होतो, पण याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही असंही त्याने सांगितलं.