मुंबई : असं म्हणतात, एखाद्याला रडवणं सोपं आणि हसवणं फार कठीण. पण येत्या नववर्षात ही जबाबदारी उचलली आहे झी स्टुडिओज आणि संजय जाधव यांनी!! दुनियादारीच्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडिओज आणि संजय जाधव ही द्वयी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याकरिता पुन्हा एकदा एकत्र आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय जाधव दिग्दर्शित, झी स्टुडिओजचा नवा कोरा मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ज्याचे नाव आहे, ये रे ये रे पैसा. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना एक खास भेट देण्याचा पायंडा गेल्या काही वर्षांपासून झी स्टुडिओजने पाडला आहे. नटरंग, टाईमपास, लोकमान्य, नटसम्राट, ती सध्या काय करते अशा दर्जेदार कलाकृती देणाऱ्या झी स्टुडिओज् प्रस्तुत ये रे ये रे पैसा हा चित्रपट येत्या नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजेच ५ जानेवारी २०१८ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 


या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते संजय नार्वेकर आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी तसेच अवघ्या महाराष्ट्राचे लाडके आणि सुप्रसिद्ध कलाकार सिद्धार्थ जाधव, उमेश कामत आणि तेजस्विनी पंडित हे प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.


नुकताच ह्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा एका पंचतारांकित हॉटेल मध्ये पार पडला. ह्या सोहळ्याला सिन्घम, चेन्नई एक्सप्रेस आणि गोलमाल सिरीज् चे हिंदी चित्रपट सृष्टीतले ख्यातनाम दिग्दर्शक रोहित शेट्टी तसेच अभिनेता श्रेयस तळपदे यांची विशेष उपस्थिती होती.  


चित्रपटाची कथा आहे पाच माणसांची आणि त्यांच्या सोबत घडणाऱ्या गमतीदार गैरसमजाची. उमेश, तेजस्विनी, सिद्धार्थ, संजय नार्वेकर आणि मृणाल कुलकर्णी म्हणजेच आदित्य, बबली, सनी, अण्णा आणि जान्हवी या पाच जणांच्या आयुष्यात घडणारी एक घटना त्यांना विचित्रप्रकारे एकमेकांसमोर आणते. आपापल्या आयुष्यात या ना त्या कारणाने पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या मागे पळत असताना होणाऱ्या भन्नाट गैरसमजांची आणि बनवाबनवीची रुपेरी पडद्यावर घडणारी मनोरंजनात्मक कॉमेडी म्हणजे ये रे ये रे पैसा.