तृप्ती गायकवाड, झी मीडिया, मुंबई :  काळानुरूप कलाविश्वातही मोठे बदल होत गेले. सिनेमांची जागा ओटीटी प्लॅटफॉर्मने घेतली. मालिका विश्वही याला अपवाद नाही. एखादा भाग राहून गेला तर सहजपणे तो स्मार्टफोनच्या स्क्रीनवर कुठेही आणि कधीही पाहता येतो. असं असूनही सगळ्याच मालिका किंवा सगळेच सिनेमे काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाही. काही सिनेमे आणि मालिका या जशा येतात तशाच निघूनही जातात. मात्र सोशल मीडिया फार अस्तित्वात नसतानाही काही मालिकांनी एक काळ खऱ्या अर्थानं गाजवला. या त्याच मालिका होत्या ज्यांनी कलाकार आणि प्रेक्षकांना जोडून ठेवलं होतं.अल्फा ते झी मराठी 25 वर्षांच्या या प्रवासात अजरामर मालिकांची भेट प्रेक्षकांना मिळाली. मालिकेतील पात्र, कथा, संवाद हे जसे प्रेक्षकांच्या आवडीचे होत गेले तितक्याच किंवा त्याहून जास्त पटीने मालिकेच्या शीर्षक गीतांनी एक वेगळाच इतिहास घडवला. दोन दशकं होऊनही मालिकांची शीर्षक गीते ऐकताना आजचा प्रेक्षकही तितकाच भावुक होतो.


आभाळमाया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जडतो तो जीव लागते ती आस, बुडतो तो सूर्य उरे तो आभास', 25 वर्षांपूर्वी हे शब्द प्रत्येक घराघरातून ऐकू येत होते. अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आणणाऱ्या या गाण्याशी प्रेक्षकांची नाळ घट्ट जोडली गेली. गीतकार मंगेश कुलकर्णी यांनी हे गाणं संगीतकार अशोक पत्की यांना पाठवलं. तेव्हा मालिकेचे दिग्दर्शक विनय आपटे यांनी त्यांना कथेची पार्श्वभूमी सांगितली होती. मात्र हवी तशी चाल अशोक पत्की यांना सुचत नव्हती. गाण्याच्या रेकॉर्डींगसाठी जेव्हा गायिका देवकी पंडित स्टुडिओमध्ये आल्या होत्या तेव्हा तिथल्या तिथे अशोकजींना चाल सुचली आणि त्यांनी गाण्याचं रेकोडिंग पूर्ण केलं.


मालिकेचं शीर्षकगीत जेव्हा निर्मात्यांना ऐकवलं तेव्हा त्यांना आवडलं नाही, मात्र विनय आपटे यांनी हेच गाणं फायनल करायचं असं सांगितलं. सुधाची गोष्ट सांगणाऱ्या आभाळमाया मालिकेच्या शीर्षक गीताला प्रेक्षकांनी आभाळ भरून प्रेम दिलं. अशोक पत्की यांची गाणी म्हणजे रसिकांसाठी पर्वणी ठरते.आजवर अनेक अजरामर गाण्यांना अशोकजींनी संगीत दिलं असलं तरी आभाळमायाच्या गाण्याशिवाय त्यांच्या संगीताच्या कारकिर्द अपूर्णच आहे. मराठी विश्वातील ही पहिली दैनंदिन मालिका आणि मालिकेच्या पात्रांपेक्षा ही जास्त प्रेम मालिकेच्या शीर्षक गीताला मिळालं.


पुढे अल्फा मराठीचं झी मराठी झालं आणि या प्रवासात अनेक मालिका येत गेल्या, मात्र पहिल्या मराठी खाजगी वाहिनीवरील पहिल्याच मराठी मालिकेच्या शीर्षक गीताने वेगळाच चाहता वर्ग निर्माण केला. स्वयंपाकासाठी भाजी निवडणाऱ्या आईपासून ते शाळेचा अभ्यास पूर्ण करून टीव्ही समोर बसणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनावर मालिकेच्या शीर्षक गीताने राज्य केलं.