झी युवावर प्रेक्षकांना मनोरंजनाची वर्षाखेर भेट `झी युवा सन्मान’!!
फक्त बेभान होऊन आयुष्य जगणारी ती तरुणाई हा समज पूर्णपणे खोडून काढत समाजात अनेक तरुण असे काम करत आहेत की
मुंबई : फक्त बेभान होऊन आयुष्य जगणारी ती तरुणाई हा समज पूर्णपणे खोडून काढत समाजात अनेक तरुण असे काम करत आहेत की
त्यामुळे आपण प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकत आहोत. अशा कृतीशील तरूणाईच्या शिरपेचात झी युवा तर्फे युवा सन्मान पुरस्काराचा तुरा रोवला आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि अनुकरणीय कार्य करणाऱ्या युवकांना 'झी युवा सन्मान' पुरस्कार जाहीर झाले आहेत. झी युवा म्हणजे समाजात जे चांगले आहे ते समोर आणणे आणि त्याचे कौतुक करणे हे समीकरण या पुरस्कारांच्या निमित्ताने पुन्हा दृढ झाले आहे. हा कार्यक्रम झी युवावर रविवार ३१ डिसेंबर ला संध्याकाळी ७ वाजता दाखवण्यात येईल.
पुरस्काराच्या मालिकेत दहा क्षेत्रातील अकरा युवकांना सन्मानित करण्यात येणार आहे. नाशिकच्या बुद्धीबळपटू विदीत गुजराती याला ‘झी युवा क्रीडा सन्मान’ पुरस्कार देण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकावरील छेडछाड करणाऱ्या पोलिसांच्या मदतीने पकडून दीडशे लैंगिक अत्याचार रोखणार्या मुंबईच्या दीपेश टंक याला ‘दक्ष नागरिक सन्मान’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तरुण वाचक घडवणारा युवा लेखक सुदीप नगरकर ‘साहित्य सन्मान’ पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. प्रभावी प्रवासी अँप बनवून गरज व तंत्रज्ञान यांची नाळ जोडणारा मुंबईच्या सचिन टेके याला ‘उद्योजक सन्मान’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
वयाच्या पंचविशीत सर्वाधिक पेटंट घेणाऱ्या यवतमाळच्या अजिंक्य कोत्तावार याची निवड ‘विज्ञान व तंत्रज्ञान सन्मान’ पुरस्कारसाठी झाली आहे. छोटे छोटे शो करत एक दिवस स्वतःचेच रेडिओ चँनेल सुरू करणारा जिद्दी कराडचा सतीश नवाळे ‘निर्धार सन्मान’ पुरस्कारने सन्मानित होणार आहे. धावपटू गोल्डनगर्ल अशी ओळख कमावलेली सातारची ललिता बाबर ‘यशस्वीता सन्मान’ ची मानकरी ठरली आहे. अनेक लघुपट सिनेमा नाटक व मालिका यामध्ये विविध पठडीच्या भूमिका करणारा अमेय वाघ याला ‘कला सन्मान’ पुरस्कार देण्यात येणार आहे. लोकगीताचा बाज जपत संगीत प्रयोगशील करणारा गायक आदर्श शिंदे आणि नव्या युगाचा सूर सापडलेली प्रियांका बर्वे या दोघांना ‘संगीत सन्मान’ चा किताब प्रदान करण्यात येणार आहे. लहानपणीच निराधार झाल्यामुळे बालसंकुलात वाढलेला, स्वबळावर इंजिनियर होऊन चांगल्या कंपनीतील लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून सामाजिक संस्था सुरू करणाऱ्या सागर रेड्डी याचा ‘सामाजिक जाणीव’ पुरस्कार देण्यात येणार आहे.
झी युवा आणि झी टॉकीज चे बिझिनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले की, “'झी युवा सन्मान' अवॉर्ड्स त्या प्रत्येकासाठी आहे, जे स्वतःवर विश्वास ठेऊन आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याचे धाडस करतात आणि समाजासाठी मापदंड ठरतात. 'झी युवा सन्मान' या कार्यक्रमामुळे समाजातील या अनोख्या तरुणांचे प्रेक्षक नक्कीच कौतुक करतील. आणि झी युवा वाहिनीतर्फे ३१ डिसेंबरची मनोरंजनाची वर्षाखेर भेट ला प्रेक्षकांना आवडेल अशी आम्हाला खात्री आहे.”