काश्मीर मुद्द्यावर `दंगल गर्ल` झायरा म्हणाली
जाणून घ्या जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यांवर झायराच्या प्रतिक्रिया
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. राज्यसभेत गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव मांडताच आणि अनुच्छेद कलम ३५ अ रद्द करण्याच्या निर्णयाची घोषणा करताच, सर्व स्तरांतून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी बॉलिवूड कलाकार झायरा वसीमने सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
'ही वेळ सुद्धा निघून जाईल' असं ट्विट झायराने केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रीय नसलेल्या झायराने जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यांवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काश्मीरमध्ये सध्याच्या घडीला असणाऱ्या तणावाचटी परिस्थिती आणि काही वर्गांमध्ये असणारा असंतोष पाहता झायराने हे ट्विट केल्याचं लक्षात येत आहे. काही दिवसांपूर्वी धर्माचे नाव पुढे करत बॉलिवूडमधून काढता पाय घेतला होता. त्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली होती.
दरम्यान, फक्त झायराच नव्हे, तर बऱ्याच कलाकारांनी या मुद्द्यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यामध्ये अभिनेते अनुपम खेर, परेश रावल यांचाही समावेश आहे. विविध स्तरांतून आता काश्मीर मुद्द्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात झाली आहे. तेव्हा आता संमिश्र प्रतिक्रियांच्या या वातावरणात पुढे कोणत्या मुद्द्यांना चालना मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.