`झिपऱ्या` सिनेमाचा अफलातून ट्रेलर
अरूण साधू यांच्या
मुंबई : पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आधारित ‘झिपऱ्या’ चित्रपट येत आहे. ए.आर.डी. प्रॉडक्शन्स आणि दिवास् प्रॉडक्शन्स निर्मित व सहनिर्माता अथर्व पवार क्रिएशन्स तसेच अश्विनी रणजीत दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ या बहुचर्चित, प्रेरणादायी चित्रपटाचा म्युझिक आणि ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला.
मुंबईसह अनेक मोठ्या रेल्वे स्टेशनवर आपण अनेकदा बूट पॉलिश करणारी किशोरवयीन मुले बघितली असतील. ‘झिपऱ्या’ चित्रपट अशाच मुलांच्या भोवती फिरणारा आहे. यामध्ये रेल्वे स्टेशनवर बूट पॉलीश करणाऱ्या एका तरुणाचा अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास मांडण्यात आलेला आहे. सभोवतालची परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी सुद्धा भविष्याबाबत तो निराश नाही. दरम्यान, या जगण्याच्या संघर्षात झिपऱ्याला पोलिसांची भीती का वाटू लागते? झिपऱ्या आपल्या बहिणीच्या लग्नाच्या टेन्शन मध्ये नेमकं काय काय करतो? असे अनेक प्रश्न या चित्रपटात पडतात, या कथेत असलेलं एक गूढ आणि त्या भोवती घेरलेलं झिपऱ्या चं आयुष्य आहे. तर दुसऱ्या बाजूला दारिद्र्य, हालअपेष्टा यांच्यावर मात करून स्वतःसह मित्रांच्या आयुष्यात सोनेरी रंग भरण्यासाठी तो धडपड करत आहे. वास्तवदर्शी चित्रीकरण, वेगवान कथानक आणि आयुष्याकडे पहाण्याची सकारात्मक दृष्टी देणाऱ्या ‘झिपऱ्या’ बद्दलची उत्कंठा या ट्रेलर मधून अधिकच वाढली आहे.
अश्विनी दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ची निर्मिती रणजीत दरेकर यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन केदार वैद्य यांचे आहे. यामध्ये चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम कुलकर्णी, अभिनेत्री अमृता सुभाष, अमन अत्तार, देवांश देशमुख, नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे, विमल म्हात्रे, दीपक करंजीकर अशी कलाकारांची तगडी फौज आहे.
‘झिपऱ्या’चे एक खास वैशिष्ट्ये म्हणजे या चित्रपटाचे पार्श्वसंगीत ज्येष्ठ पर्कशनिस्ट तौफिक कुरेशी यांनी दिले आहे. या चित्रपटाला समीर सप्तीसकर, ट्रॉय - अरिफ यांनी संगीत दिले असून अभिषेक खणकर, समीर सामंत यांनी गीते लिहिली आहेत. कला दिग्दर्शक विनायक काटकर, नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव तर डीओपी राजेश नादोने आहेत. तीन राज्य पुरस्कारांची मोहोर उमटलेला ‘झिपऱ्या’ येत्या २२ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.