नवी दिल्ली : अभिनेता ऋतिक रोशन आपल्या आगामी 'सुपर ३०' सिनेमात दिसणार आहे. आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार आहे. गरिब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणाऱ्या आनंद कुमार यांच्या जीवनावर हा सिनेमा आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद कुमार यांच्याकडून प्रेरणा घेऊन गरीब आणि वंचित अशा शेकडो तरुणांच्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला. आनंद कुमार यांनी ४५० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे. यापैकी ३९५ विद्यार्थ्यांचं आयआयटीत निवड झाली तर इतरांची एनआयआयटी सारख्या संस्थेत निवड झाली. आनंद कुमार यांच्या आयुष्यावर 'सुपर ३०' नावाने सिनेमा बनत आहे यावरुन कळतं की त्यांची प्रसिद्धी किती आहे.


आनंद कुमार यांच्या भूमिकेत ह्रतिक


'सुपर ३०' या सिनेमात ऋतिक रोशन हा आनंद कुमार यांच्या भूमिकेत असणार आहे. आनंद कुमार सारखा लूक करण्यासाठी ऋतिकने खूप मेहनतही घेतली आहे. या सिनेमाची शूटिंग जानेवारी महिन्यात सुरु झाली असून पुढील वर्षी जानेवारी महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याच दरम्यान आनंद कुमार यांनी झी न्यूजच्या ऑनलाईन टीमसोबत टाऊनहॉल केलं. यावेळी आनंद कुमार यांनी आपल्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले.


केम्ब्रिजमध्ये शिकण्याची संधी मिळाली मात्र...


आपल्या आयुष्यातील संघर्षाच्या दिवसांची आठवण करुन देताना आनंद कुमार यांनी सांगितले की, त्यांना सायन्स प्रोजेक्ट बनवण्याची खूप आवड होती. तसेच गणित विषयाचीही आवड होती. त्यामुळेच त्यांना १९९४ मध्ये केम्ब्रिजमध्ये शिक्षणाची संधी मिळाली मात्र, आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने ते जाऊ शकले नाहीत. वडील रेल्वेत नोकरीला होते. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं.


पापड विकून केला अभ्यास...


आनंद कुमार यांनी सांगितले की, वडिलांच्या निधनानंतर अनुकंप तत्वावर मला नोकरी मिळत होती मात्र, आईने शिक्षण पूर्ण करण्यास सांगितलं. पैशांसाठी आईने पापड विकण्यास सुरुवात केली आणि त्यावर घर चालत होतं.



प्रसिद्धी मिळाली आता राजकारणात एन्ट्री?


प्रसिद्धी मिळाल्यानंतर आता राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न आनंद कुमार यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना आनंद कुमारांनी म्हटलं, समाजात बदल घडविण्यासाठी राजकारणातच जावं असं गरजेंचं नाहीये. समाजाच्या भल्यासाठी आपल्या क्षमतेनुसार जे करत आहे त्यावर मी खूष आहे. भलेही आता माझ्या कामाचं कौतुक होत आहे मात्र, राजकारणात गेल्यावर अनेक आरोप लावण्यात येतात त्यामुळे राजकारणात जाण्याचा कुठलीच प्लान नाहीये.