पणजी : २०१६ साली भारताकडून पाकिस्तानात करण्यात आलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'चं नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) डी एस हुड्डा यांनी मोदी सरकारला चांगलाच टोला लगावलाय. अर्थात, मोदी सरकारनं सेनेला सीमेच्या पलिकडे हल्ला करण्याची परवानगी देऊन मोठा संकल्प दाखवलाय. परंतु, सेनेचे हात त्यापूर्वीही कधीच बांधलेले नव्हते, असं डी एस हुड्डा यांनी शुक्रवारी म्हटलंयत. हुड्डा यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये उरी दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेपलिकडे 'सर्जिकल स्ट्राईक' दरम्यान सेनेच्या उत्तरी टोकाचं नेतृत्व केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हुड्डा पणजीत जाहिरात क्षेत्रातील संघटनांनी आयोजित केलेल्या एका वार्षिक कार्यक्रम 'गोवा फेस्ट'मध्ये सहभागी झाले होते. तिथंच त्यांनी हे वक्तव्य केलंय. 'सद्य सरकारनं सीमेपलिकडे जाऊन सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटमध्ये हवाई हल्ल्याची परवानगी देऊन निश्चितच महान राजकीय संकल्प दाखवलाय. परंतु, यापूर्वीही सेनेचे हात कधीच बांधलेले नव्हते' असं त्यांनी म्हटलंय. 


'सेनेला मोकळिक देण्याबद्दल खूपच चर्चा झाली. परंतु, १९४७ पासून सेना सीमेवर स्वतंत्र आहे. सेनेनं आत्तापर्यंत तीन-चार युद्ध लढलेत... नियंत्रण रेषा एक धोकादायक जागा आहे कारण तुमच्यावर गोळीबार केला जातोय आणि जमिनीवर सैनिकांना ताबडतोब त्याला प्रत्यूत्तर द्यावं लागतं. त्यासाठी ते माझीही परवानगी घेणार नाहीत' असंही त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय. 



'परवानगी घेण्याचा काही प्रश्नच नाही. सेनेला मोकळिक देण्यात आलेली आहे आणि हे सर्व एकत्रच घडलंय... याला 'पर्याय' नव्हता' असंही ही एस हुड्डा यांनी म्हटलंय.