खरी शिवजयंती...!
“अहो, चिरंजीव कुठे आहेत?” किचनकडे पाहात पिताश्रींनी विचारलं.
अविनाश चंदने, मुंबई :
“अहो, चिरंजीव कुठे आहेत?” किचनकडे पाहात पिताश्रींनी विचारलं.
“मिरवणुकीसाठी गेलाय.” किचनमधून तेवढाच जोरात आवाज आला.
“मिरवणूक? आज कसली मिरवणूक?” पेपर चाळताना पिताश्रींनी पुन्हा प्रश्न केला.
“अहो कमालच झाली तुमची! आज शिवजयंती आहे ना!” किचनमधून पुन्हा उत्तर आलं.
“अरे हो... विसरूनच गेलो होतो की! तीन दिवसांच्या सुट्टीमुळे लक्षातच आलं नाही बघ.” हॉल आणि किचनमधून संवाद सुरू असतानाच चिरंजीवांचं आगमन झालं. आणि पिताश्रींनी थेट चिरंजीवांकडे मोर्चा वळवला.
“काय चिरंजीव, कसं चाललंय तुमचं?”
“एकदम मस्त!” वडिलांचा मूड लक्षात घेऊन चिरंजीवांनी उत्तर दिलं.
“काय रे ४ मार्चला आहे ना शिवजयंती?” मग आज कसा काय मिरवणुकीला गेलास? आणि ४ मार्चच्या मिरवणुकीलाही जाणार का पुन्हा?”
“आजची तारखेनुसार सरकारी शिवजयंती आहे आणि ४ मार्चची तिथीनुसार शिवजयंती आहे.” दोन्ही शिवजयंती साजरी करणार आम्ही. चिरंजीवांनी पटकन उत्तर दिलं.
“शिवजयंतीच्या तारखांच्या घोळात तुम्ही कशाला रे पडताय?” पिताश्रींनी पुन्हा प्रश्न केला.
“यात कसला आलाय तारखांचा घोळ?” चिरंजीवांनी तेवढ्याच तत्परतेनं उत्तर दिलं.
“घोळ नाही तर काय? आता १९ फेब्रुवारी आणि नंतर तिथीनुसार. ‘ती’ मंडळी तिथीनुसारच साजरी करतात तर काही मंडळी सरकारी तारखेनुसार शिवजयंती साजरी करतात. तुम्ही कशाला पडला या वादात?”
“बाबा… यात कसला आलाय वाद आणि घोळ?” चिरंजीवांनी तत्परतेने प्रतिप्रश्न केला. “छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आणि कुणी कधी साजरी करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.”
“तेच तर म्हणतोय ना मी! एक दिवस ठरवला ना मग पुन्हा तिथीनुसार की १९ फेब्रुवारी हा वादच कशाला हवा?” पिताश्रींनी पुन्हा आक्रमक होत विचारलं.
“बाबा, एक गोष्ट लक्षात घ्याना की, शिवछत्रपती हे एकमेव असे आहेत की ज्यांची जयंती वर्षातून दोनवेळा साजरी होती. ही सकारात्मक बाब नाही का? इतर सर्व महापुरुषांची केवळ एकदाच जयंती साजरी होते.” चिरंजीवांनी शांतपणे पण तेवढ्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं. “आणि मी तर म्हणतो शिवछत्रपतींचं कार्यच असं आहे की त्यांची जयंती वर्षभर साजरी करायला हवी. त्यातले केवळ दोनच दिवस आपण साजरी करतो. पण एका गोष्टीचा राग येतो. उठता बसता शिवरायांचं नाव घेणारे १९ फेब्रुवारीला टाळतात आणि काही लोक तिथीला नाक मुरडतात. आम्ही मात्र, दोन्ही दिवस तेवढ्यात आनंदानं शिवजयंती साजरी करतो आणि मिरवणूकही काढतो. आणि मिरवणूक काढणं म्हणजेच शिवजयंती नव्हे तर त्यांचे विचार प्रत्यक्षात आणणं हीच खरी शिवजयंती असं आम्ही मानतो.” चिरंजीवांनी एका दमात रागाला वाट करून दिली.
चिरंजीवांच्या उत्तरानं पिताश्रींना पुढं बोलणं अवघड गेलं. त्यामुळे त्यांनी किचनकडे मोर्चा वळवला आणि एवढंच म्हणाले, “अगं ऐकतेस काय, आपला चिरंजीव आता नुसताच मोठा नाही तर खूप समजूतदारही झालाय. त्याला जे उमजलंय ते आपल्या स्वयंघोषित नेत्यांनाही कळलं नाही!”.