पाणी प्यायल्याने मृत्यू होऊ शकतो का? तो एका तासात 6 बाटल्या पाणी प्यायला अन्...
Death Due To Drinking Water: रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान तो तब्बल 6 बाटल्या पाणी प्यायल्यानंतर त्याला ग्लानी येऊ लागली. एखाद्या औषधाचा परिणाम झाल्याप्रमाणे तो वागू लागला. त्याचे हातपायही सुन्न पडले. तातडीने त्याला रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं.
Death Due To Drinking Water: पाण्याला जीवन असंही म्हणतात. पृथ्वीवर प्रत्येक सजीवाला पाणी हे अत्यावश्यक आहे. धरतीवरील सर्वच झाडं, प्राणी हे पाण्याशिवाय जगू शकत नाहीत. मात्र पाणी प्यायल्याने एखाद्याचा मृत्यू झाला तर? खरं तर पाणी न प्यायल्याने लोकांचा मृत्यू झाल्याचं तुम्ही यापूर्वी अनेकदा वाचलं, ऐकलं असेल. पण पाणी प्यायल्याने मृत्यू कसा काय होऊ शकतो असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. मात्र अमेरिकेत सध्या अशीच एक घटना चर्चेत आहे.
कुठे घडला हा प्रकार?
येथील एका लहान मुलाची प्रकृती अती जास्त पाणी प्यायल्याने इतकी खालावली की तो मृत्यूच्या दाढेत जाऊन परतला. सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने या मुलाचा जीव वाचला. पण उपचार मिळाले नसते तर या मुलाचा निश्चित मृत्यू झाला असता. मात्र हे सर्व पाणी प्यायल्याने कसं झालं? 'डेली स्टार'ने यासंदर्भातील वृत्तांकन केलं असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 वर्षीय जॉर्डन नावाचा मुलगा त्याच्या कुटुंबाबरोबर दक्षिण कॅरोलॉना येथील कोलंबियामध्ये वास्तव्यास असून त्याच्याबरोबरच हा प्रकार घडला.
नक्की घडलं काय?
4 जुलै रोजी जॉर्डन त्याच्या भावंडांबरोबर खेळत होता. अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याला फार गरम होऊ लागल्याने त्याने बाटलीने पाणी पिण्यास सुरुवात केली. मात्र जॉर्डन प्रमाणापेक्षा अधिक पाणी प्यायलाय. जॉर्डनची आई स्टेरी हिच्यासमोरच तो 6 बाटल्या पाणी प्यायला. रात्री साडेआठनंतर तासाभरात जॉर्डन एवढं पाणी प्यायला की तो आजारी पडला.
पाणी प्यायल्यानंतर तो बेशुद्ध पडला
जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने जॉर्डन बेशुद्ध पडत होता. जॉर्डनला साधं उभंही राहता येत नव्हतं. हळूहळू जॉर्डनचे हातपायही काम करायचे बंद पडू लागले. आपल्या मुलाने एखादं औषध घेतलं असून त्याला गुंगी वगैरे येत आहे की काय असं जॉर्डनच्या पालकांना वाटलं. अचानक जॉर्डनला उलट्या होऊ लागल्या. त्याची प्रकृती खालावत असल्याचं पाहून त्याच्या आई-वडिलांनी त्याला तातडीने रिचलॅण्ड चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर...
जॉर्डनची तपासणी केल्यानंतर त्याला वॉटर इटॉक्सिकेशन झाल्याचं स्पष्ट झालं. जॉर्डनच्या शरीरामधील सोडियमचं प्रमाण फारच कमी झालं होतं. त्यामुळे त्याच्या मेंदूला सूज येऊ लगाली. शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढल्याने मृत्राशयाला पाण्यावर प्रक्रिया करता येत नाही. असा व्यक्तींची शुद्ध हरपते. अशा व्यक्ती अगदी कोमातही जाऊ शकतात किंवा त्यांचा मृत्यूही होऊ शकतो.
पालकांचं इतर पालकांना आवाहन
सुदैवाने जॉर्डनच्या आईने त्याला 6 बाटल्या भरुन पाणी पिताना पाहिल्यानंतर त्याला लघवीला लागावी म्हणून काही गोष्ट खायला दिल्या. डॉक्टरांनी जॉर्डनला सोडियम आणि पोटॅशियमचा डोस दिला. त्यामुळे त्याच्या शरीरामधील रक्तप्रवाह सुरळीत झाला. आता जॉर्डनच्या पालकांनाही इतर पालकांनाही आपल्या मुलांवर नजर ठेवावी असा सल्ला दिला आहे.