मुंबई : नवीन वर्ष सुरु होण्यासाठी काही तासांचा अवधी राहिला आहे. पण 2022 च्या आगमनापूर्वीच देशात कोरोनाच्या वाढत्या संख्येने चिंता वाढवली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, 24 तासांत कोरोनाच्या 13 हजार154 नवीन रुग्णांची नोंद झालीये. तर आता यामध्येच ओमायक्रॉनच्या धोकादायक व्हेरिएंटची वेगळी लक्षणं समोर आली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 900 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होतेय. यामध्ये दिल्ली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असल्याची नोंद करण्यात आली आहे.


कोरोना महामारीच्या गेल्या दोन लाटांमध्ये ताप, सर्दी, खोकला अशी सामान्य लक्षणं दिसून आली. परंतु युनायटेड किंगडममधील एका संशोधकाने, ओमायक्रॉन व्हेरिएटंची आणखी दोन नवीन लक्षणं ओळखली आहेत. ही लक्षणं सहसा कोरोना विषाणूशी संबंधित असल्याचं दिसून आलेलं नाही.


किंग्ज कॉलेज लंडनमधील जेनेटिक एपिडेमियोलॉजीचे प्राध्यापक टिम स्पेक्टर यांनी सांगितलं की, ओमायक्रॉनची दोन नवीन लक्षणं म्हणजे मळमळ आणि भूक न लागणं. 


टीम यांच्या मताप्रमाणे, ज्यांना कोविड-19 ची लस मिळाली आहे आणि ज्यांना लसीचा बूस्टर डोस मिळाला आहे अशा लोकांमध्ये देखील ही लक्षणं आढळून येतायत.


काही लोकांना मळमळ, किंचित ताप, घसा खवखवणं आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणंही दिसून येत असल्याचं टिम यांनी सांगितलंय.


यूएस मधील सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलच्या मते, ओमायक्रॉनशी संबंधित काही सामान्य लक्षणे म्हणजे खोकला, थकवा, कफ आणि नाक वाहणं. 


Omicron हा व्हेरिएंट 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. तेव्हापासून कोविडच्या या व्हेरिएंटने जगातील 90 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. अमेरिका आणि ब्रिटन सारख्या जगातील अनेक प्रमुख देशांमध्येही यामुळे मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे.