ओव्याचे आरोग्यासाठी ५ मोठे फायदे
ओवा खाण्याचे अनेक फायदे
मुंबई : सर्वसाधारणपणे ओव्याचा वापर स्वयंपाकामध्ये केला जातो. पण ओवा खाण्याचे अनेक फायदे आहे. पोटाशी संबंधित अनेक विकारांमध्ये ओवा गुणकारी आहे. पोटदुखी, गॅसेस, उलट्या होणे, आम्लपित्त या सारख्या विकारांवर ओवा फायदेशीर ठरतो. सर्दी-पडसेवर देखील ओवा घेतल्याने फायदा होतो.
१. ओवा खाल्याने शरीरातील हानिकारक तत्वे बाहेर पडतात. कफ निघून जाण्यासाठी देखील ओव्याचा उपयोग होतो. पोटाशी संबंधित विकारांवर ओव्याचे सेवन फायदेशीर ठरते.
२. ओवा, काळे मीठ, आणि सुंठ एकत्र करून त्याची पावडर करुन घ्यावी. हे चूर्ण घेतल्याने पित्त आणि उलट्यांच्या त्रासामध्ये लगेच आराम मिळतो.
३. वजन कमी करण्यासाठी ओवा फायदेशीर ठरतो. ओवा टाकून पाणी प्याल्याने शरीराची पचन क्षमता वाढते. एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा रात्रभर भिजवून ठेवावा. सकाळी या पाण्यामध्ये एक चमचा मध घालून हे पाणी रिकाम्या पोटी प्यावे.
४. सतत खोकला येत असेल तर ओव्याचे पाणी त्यावर अतिशय गुणकारी आहे. यासाठी पाण्यामध्ये ओवा घालून हे पाणी उकळून घ्यावे. नंतर थोडेसे काळे मीठ घालून ह्या पाण्याचे सेवन करावे.
५. गुडघे दुखत असल्यास ओवा गरम करावा आणि तो एका रुमालात बांधून घेऊन त्याने गुडघ्यांना शेक द्यावा. त्यामुळे गुडघ्यांना आराम मिळतो.