चुंबक मॅनमागची चुंबकाची सत्यता लवकरच बाहेर येणार?
कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नसल्याचं अंनिसने स्पष्ट केलं आहे.
मुंबई : कोविशिल्ड लस घेतल्यानंतर शरीराला चमचे तसंच नाणी चिटकत असल्याचा 71 वर्षीय अरविंद सोनार यांचा व्हिडीयो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडीयो व्हायरल झाल्यानंतर अंधश्रद्धेला वाव मिळू नये यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याची तातडीने पाहणी केलीये. या पाहणीनंतर यामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
झी 24 तासशी बोलताना अंनिसचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांच्या म्हणण्याप्रमाणे, ही घटना म्हणजे अंधश्रद्धा किंवा दैवीशक्ती नाही. यामागील कारण वैज्ञानिक कारण हे न्यायवैद्यकशास्त्र समजून घेऊन पुढे आणलं पाहिजे. या दृष्टीने आम्हीही प्रयत्न करणार आहोत. सोनार यांच्या शरीराला वस्तू चिटकतायत हे खरं आहे.
चांदगुडे पुढे म्हणाले, "यापूर्वी देखील अशी प्रकरण समोर आली आहेत. अशा गोष्टीची नोंद गिनीच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आलीये. त्यामुळे हा काही दैवी चमत्कार नाहीये."
अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, विज्ञानाचे नियम हे सार्वत्रिक असून यामागे जे वैज्ञानिक कारण असेल ते समोर येण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे लोकांनी या गोष्टींवर विश्वास ठेऊ नये. या घटनेनंतर लस घेण्यास कोणीही नकार देऊन नये."
दरम्यान या घटनेवर वैद्यकीय क्षेत्रातून देखील प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत बोलताना डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, लसीकरणाचा या गोष्टीशी संबंध जोडणं संपूर्पणे चुकीचं आहे. शरीराला चुंबकत्व निर्माण होणं आणि लसीकरणाचा काहीही संबंध नाही. आपण कोटी लोकांचं लसीकरण केलं असल्याने हे त्याच्याशी संबंधित नाही."