मुंबई : देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत आहे. परंतु, कोरोनापासून मुक्त झालेल्या अनेकांना इतर समस्यांचा सामना करावा लागतोय. यापूर्वी ब्लॅक, व्हाईट आणि यलो बुरशीच्या तक्रारी समोर आल्या होत्या. तर आता कोरोना बरे झालेल्या लोकांमध्ये एक नवीन प्रकारची समस्या समोर येत आहे. सायटोमेगालो असं या व्हायरसचं नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या समस्येमध्ये, रुग्णाला शौचाच्या मार्गाने रक्तस्त्राव होतो. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात कोविडरुग्णांमध्ये सायटोमेगालो विषाणूची पाच प्रकरणं नोंदली गेली आहेत. यामध्ये पाचपैकी एका रूग्णांचा मृत्यू झाला आहे.


एएनआयच्या वृत्तानुसार, पोस्ट-कोविड सायटोमेगालो व्हायरसमुळे रेक्टल ब्लिडींगच्या या पाच घटनांची भारतातील हा पहिला रिपोर्ट आहे. हे सर्व रुग्ण दिल्ली-एनसीआरचे होते. सर गंगाराम रुग्णालयाचे चेअरमन डॉ. अनिल अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 45 दिवसांत कोरोनातील पाच रुग्णांमध्ये सायटोमेगालो विषाणूमुळे शौचादरम्यान रक्तस्त्राव झाल्याची घटना घडली आहे. ते म्हणाले की, हे सर्व रुग्ण कोरोनातून मुक्त झाल्यानंतर 20 ते 30 दिवसांनंतर ओटीपोटात दुखण्याचा त्रास आणि शौचादरम्यान रक्तस्रावाची समस्या होती. 


डॉक्टरांचे म्हणणं आहे की, कोरोनाच्या उपचारात वापरली जाणारी औषधं, विशेषत: स्टेरॉइड्स रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात. ज्यामुळे रुग्णांना इतर अनेक प्रकारचे आजार होतात. अशाच प्रकारचं एक संक्रमण म्हणजे सायटोमेगालो विषाणू. हा विषाणू कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांवर अटॅक करतो.


सायटोमेगालो विषाणू हा एक सामान्य हर्पीस वायरस आहे. सहसा हा विषाणू शरीरात निष्क्रिय असतो. गर्भधारणेदरम्यान किंवा रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या लोकांना अधिक धोका आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन (सीडीसी) च्या म्हणण्यानुसार, हा एक सामान्य व्हायरस आहे आणि कोणत्याही वयोगटातील लोकांनाही याचा त्रास होऊ शकतो.