दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: जर तुम्ही लसीचे दोन डोस पू्र्ण केले नसतील तर तातडीने लस घ्या, कारण आता लसीकरणाशिवाय तुम्हाला सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार नाहीये. राज्य सरकारने नुकताच एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानुसार, लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींना आता सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्या परवानगी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारने याबाबत नवी नियमावली जारी केली आहे. या नव्या नियमानुसार, मुंबईतील लोकल ट्रेनप्रमाणे एसटी, बससेवा, टॅक्सी, रिक्षा या वाहतुकीने  प्रवास करायचा असेल तर दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात आलेली आहे. याशिवाय कोरोनाचे नियम न पाळणार्‍यांविरुद्ध दंडाची व्याप्ती वाढवण्याचाही निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.


रिक्षा, टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाने मास्कचा वापर केला नसेल तर प्रवाशाला 500 रुपये आणि रिक्षा-टॅक्सी चालकालाही 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. त्याचप्रमाणे दुकानात आलेल्या ग्राहकाने मास्क घातला नसेल तर ग्राहकाला 500, तर संबंधित दुकानदाराला 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.


मॉल्समध्ये ग्राहकांच्या चेहऱ्यावर मास्क नसेल तर मॉल्सच्या मालकाला तब्बल 50 हजार रुपयांचा फटका बसणार आहे. 


नव्या नियमावलीनुसार, राजकीय सभांना, जाहीर कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र नियम पाळले जात नसतील तर संबंधित आयोजकांवर 50 हजार दंड आकारण्याबरोबर कार्यक्रम बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आलाय.


वानखेडे स्टेडियममध्ये 3 ते 7 डिसेंबर दरम्यान होणार्‍या भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर स्टेडियम आणि खुल्या मैदानात 25 टक्के प्रेक्षकांना उपस्थितीस परवानगी दिली आहे.