मुंबई : नवजात बाळासाठी आईचं दूध हाच चांगला आणि मुख्य आहार असतो. आईचं दूध हे बाळाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासही मदत करतं. जेव्हा बाळाला पुरेसं दूध मिळत नाही तेव्हा बाळाला पुरेशी पोषणतत्त्व मिळत नाहीत आणि ते कमकुवत होण्याची शक्यता असते. याशिवाय त्याचा शारीरिक आणि मानसिक विकास योग्य होणार नाही. मात्र जर दूध प्यायल्यानंतरही बाळ रडत असेल तर त्यामागचं कारण असू शकतं की आईचं दूध पुरेशा प्रमाणात तयार होत नसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की, आईचे दूध योग्य प्रमाणात तयार झालं पाहिजे. जर मुलाच्या शरीरात पोषणाचा अभाव असेल तर तो आजारी पडण्याची शक्यता असते. आईला बाळासाठी पुरेश्या प्रमाणात दूध न येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. जी खासकरून नवमातांना माहित असणं आवश्यक आहे.


रात्री बाळाला दूध न पाजणं


जर तुम्ही रात्री बाळाला दूध पाजलं नाही तर दुधाचे उत्पादन कमी होऊ लागते. वास्तविक, रात्री शरीरात प्रोलॅक्टिनची पातळी वाढते. प्रोलॅक्टिन दूध तयार करण्यासाठी मदत करते. त्यामुळे रात्री बाळ झोपलं जरी असेल तरीही 1 मिनिट का होईना त्याला दूध पाजावं


हार्मोन्सचं असंतुलन


अनेक कारणांमुळे महिलांच्या शरीरात हार्मोन्स असंतुलित होऊ शकतं. विशेषत: गर्भधारणेदरम्यान, प्रसूतीनंतर, पिरियड्स या कारणांमुळे हार्मोन्सचं असंतुलन होतं. अशा परिस्थितीतही स्तनात कमी दूध तयार होण्यास सुरवात होते. बर्‍याच वेळा हार्मोन्सचं संतुलन नसल्यामुळे, गर्भधारणेच्या वेळी आणि नंतरही बर्‍याच समस्या उद्भवू लागतात. या असंतुलनामुळे दुधाचं उत्पादन कमी असू शकते. अशावेळी डॉक्टरांशी संपर्क साधावा.


गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन 


गर्भनिरोधक औषधांच्या सेवनानेही दुधाचं उत्पादन कमी होऊ शकते. गर्भनिरोधक गोळ्या हार्मोन्सचं emissions रोखतात. त्याचे दुष्परिणामही बरेच असू शकतात. त्यामुळे बाळ 6 महिन्यांचं होईपर्यंत तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या घेणं थांबवलं पाहिजे.


ब्रेस्ट टिश्यूंना येणारी सूज


बाळाचा जन्म होताच आईचं दूध तयार होण्यास सुरवात होते. अशा परिस्थितीत लहान बाळाला थोड्या थोड्या अंतराने दूध पाजणं महत्वाचं आहे. बाळाला दूध न पाजल्याने स्तनांच्या टिश्यूंमध्ये सूज येते. या सूजेमुळे आईच्या दुधाचं उत्पादन काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असते.