प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : शरीर पिळदार बनवण्याच्या नादात कधीकधी आपण कृत्रिम आहार घेतो. खूप हेव्ही डाएट करतो. मात्र हे तुमच्या जीवावर बेतू शकतं. कुर्ल्यातल्या श्रीदीप गावडेनेही असाच आपला जीव धोक्यात घातला. मात्र त्याच्या जन्मदात्या आईनेच त्याला दुसऱ्यांदा जन्म दिला. श्रीदीपच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं लक्षात आल्यावर जन्मदात्या आईनेच आपली किडनी देऊन जणू त्याला पुन्हा एकदा जन्म दिला... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पिळदार शरीरयष्ठी असलेला श्रीदीप गावडे कुर्ल्यातल्या बैलबाजार येथे राहतो. शरीरसौष्ठव स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय नामांकन त्याने मिळवली आहेत. शरीर पिळदार दिसावं म्हणून कृत्रिम आहार, अपार मेहनत तो घ्यायचा. मात्र सध्या मुंबईतल्याच एका रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ त्याच्यावर आलीय. 


शरीर कमवण्यासाठी अनेक जण तासनतास व्यायाम करतात, कृत्रिम आहार घेतात, काही वेळा सप्लिमेंटचाही वापर करतात मात्र असं करताना त्याचे काही दुष्परिणामही होतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि वेळोवेळी तपासणी करूनच गोळ्या आणि आहार असावा असं तज्ञाचं मत आहे.


शरीर सुदृढ तर हवंच त्यासाठी व्यायामही हवा मात्र त्याचा अतिरेक नको. नाहीतर करायला जावं एक आणि व्हावं दुसरंच अशी श्रीदीप सारखी वेळ तुमच्यावरही येऊ शकते. श्रीदीपचा पुर्नजन्म त्याच्या आईमुळे झाला. मात्र प्रत्येकजण श्रीदीप एवढा नशीबवान असेलच असं नाही. त्यामुळे कोणताही व्यायम प्रकार करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.