कपिल राऊत, झी २४ तास, ठाणे : नैराश्य, अश्लील चित्रफिती पाहणे आणि तुटत चाललेला संवाद यामुळे गेल्या तीन वर्षांपासून स्किझोफ्रेनियाचे ८४ हजार ८५८ रुग्ण उपचारासाठी ठाणे मनोरुग्णालयात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वात जास्त असल्याचे ठाणे मनोरुग्णालयाने दिलेल्या आकडेवारीवरून निदर्शनास आले आहे. या रुग्णांत वृद्धांची संख्याही कमालीची आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे, भिंवडी, पालघर आणि पुणे येथून रुग्ण विविध मानसिक आजारांवरील ठाणे मनोरुग्णालयात उपचारांसाठी येत असतात. गेल्या काही वर्षांपासून यातील  स्किझोफ्रेनिया या आजाराच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. 


१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत ४१ हजार ५८६ रुग्णांनी, तर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत ३९ हजार ८७६ रुग्ण उपचारासाठी मनोरुग्णालयात आल्याची नोंद आहे. या आजारातील केवळ २० टक्के रुग्ण पूर्णत: बरे होत असल्याचेही डॉक्टर म्हणाले.


स्किझोफ्रेनिया या आजाराबद्दल समाजामध्ये जनजागृती पसरण्याची गरज आहे. यासाठी ठाणे मनोरुग्णालयातर्फे रुग्णांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. रुग्णालयात तरुणांचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. यासाठी पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.असे ही डॉक्टर सांगत आहेत. 


शारिरीक व्याधींसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी धडपड केली जात असली तरी अद्याप मानसिक आजारांबाबतचे गैरसमज कायम आहेत. वैद्यकीयशास्त्र झपाट्याने प्रगती करत असतानाही मानसिक व्याधींसाठी तांत्रिक अथवा बुवाबाजीचा आधार घेतला जातो. अशा उपायांमुळे मूळ उपाय मिळण्यास दिरंगाई होत असल्याने स्क्रिझोफेनियासारखे आजार फोफावतात. योग्यवेळी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली तर मानसिक आजार बरे होऊ शकतात. या उद्देशाने राज्यभरातील १५० मानसोपचार तज्ज्ञांनी एकत्र येऊन 'गाव तेथे मानसोपचार-राज्यव्यापी मनस्वास्थ्य जनजागृती अभियान' या प्रबोधनात्मक उपक्रमाची सुरुवात केली आहे. 


काय आहे स्किझोफ्रेनिया आजार?


स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार असून मेंदूचा विकारही आहे. मेंदूमधील डोपामिन या रसायनाच्या कमतरतेमुळे हा आजार होतो. जनुकांमधील बदल तसेच गर्भवती महिलेला ताप अथवा कुपोषित असल्यास बाळाला हा स्किझोफ्रेनिया आजार होण्याची जास्त शक्यता असतो.


स्किझोफ्रेनिया झालेल्या रुग्णांना विचार, भावना आणि वागणूक यात दोष निर्माण होतो. या आजारामध्ये व्यक्तींचा वास्तवाशी संबंध तुटतो, आणि तो माणूस स्वत: भ्रामक आणि आभासी जगामध्ये जगायला लागतात. रुग्णाचा मनावरील ताबा सुटतो. आजाराच्या स्वरूपानुसार त्यांच्यावर उपचार करत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


ही आहेत स्किझोफ्रेनियाची लक्षणं


* दैनंदिन जीवनामधील कामावर लक्ष न लागणे
* स्वत:सोबतच पुटपुटणे
* भीती किंवा आभास निर्माण होतो
* लैगिंक भावना वाढतात