बूस्टर डोसबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय?
सध्या, कोरोना लसीचा बूस्टर डोस हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिला जातो.
मुंबई : कोरोना लसीचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोसबाबत केंद्र सरकार लवकरच आपल्या धोरणावर पुनर्विचार करण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोना प्रतिबंधक तिसरा डोस विशिष्ट वयोगटांना संरक्षण प्रदान करण्यात अपयशी ठरतेय.
सध्या, कोरोना लसीचा बूस्टर डोस हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिला जातो. एका वेबासाईटच्या बातमीत नमूद केल्याप्रमाणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, बूस्टर डोसबाबत पुन्हा विचार करावा लागेल. यावेळी काळजीपूर्वक विचार करून धोरण बदलावं लागेल.
अधिकारी म्हणाले, 'बूस्टरचा पुनर्विचार करावा लागेल. धोरण अतिशय काळजीपूर्वक बदलावं लागेल. तिसरा डोस देण्यात आलेल्या कोणत्याही देशांमध्ये, तो फायदेशीर असल्याचं दिसून आले नाही. त्यामुळे आपण आंधळेपणाने कोणत्याही देशाच्या मार्गावर चालू शकत नाही."
आम्हाला आमच्या स्थानिक तज्ज्ञांचं म्हणणं ऐकावं लागेल आणि आमचे निर्णय मूल्यमापनावर आधारित असतील, असंही त्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलंय.
लसीकरणासाठी राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यात मंगळवारी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीमध्ये बूस्टर डोसवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
काही देशाबाहेरील संशोधनातून असं समोर आलंय की, बूस्टर डोस कोरोना व्हायरसपासून मजबूत संरक्षण देण्यास मदत करतात. मात्र काही अभ्यासांच्या प्राथमिक परिणामांमध्ये असं दिसून आलंय की, तिसऱ्या डोस घेतल्यानंतर काही आठवड्यांत अँटीबॉडीजमध्ये घट होते.