दिल्लीनंतर आता महाराष्ट्रातही ओमायक्रॉनचं Community Spread?
वाढत्या रूग्णसंख्येमुळे तिसऱ्या लाटेची चिन्हं स्पष्टपणे दिसतायत.
मुंबई : देशभरात कोरोनाच्या रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसतेय. वाढत्या रूग्णसंख्येमुळे तिसऱ्या लाटेची चिन्हं स्पष्टपणे दिसतायत. दरम्यान, महाराष्ट्र आणि राजस्थानमधून चिंताजनक बाब समोर आली आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचा कम्युनिटी स्प्रेड झाल्याचं म्हटलं जातंय. आतापर्यंत सरकारने याबाबत औपचारिक घोषणा केली नसून सध्या याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
ओमायक्रॉनचा कम्युनिटी स्प्रेड
आतापर्यंत, केवळ दिल्लीने औपचारिक घोषणा केली असून याठिकाणी ओमायक्रॉन व्हेरिएंटचा कम्युनिटी स्प्रेड झाला आहे. दरम्यान आता जी प्रकरणं समोर येतायत त्यांची कोणतीही ट्रॅवल हिस्ट्री समोर आलेली नाही. आता असाच प्रकार महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येही दिसून येतोय. ओमायक्रॉन ज्या वेगाने पसरत आहे ते पाहता कम्युनिटी स्प्रेडचा धोका वाढला आहे.
उदयपूरमध्ये ओमायक्रॉनमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा देखील ट्रॅवल हिस्ट्री नव्हती. या प्रकरणात अद्याप कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आलेलं नाही. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटने धोकादायक रूप धारण केलं असून समाजातील अनेक भागात त्याचा प्रसार झाल्याची शक्यता वर्तवली जातेय.
महाराष्ट्राला अधिक फटका
राजस्थानमध्ये ओमायक्रॉनचे आतापर्यंत 70 हून अधिक रुग्ण समोर आले आहेत. तर जयपूर आणि उदयपूरमधील परिस्थिती देखील चिंताजनक आहे. याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसलेला आहे. राज्यात ओमायक्रॉनची 450 प्रकरणं समोर आली आहेत.
राजधानी दिल्लीतही प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. या वाढत्या प्रकरणांमुळे निर्बंध लावण्यात आले आहेत मात्र प्रसाराचा वेग कमी झालेला दिसत नाही. दरम्यान दिल्लीत कालच्या दिवसात कोरोनाच्या 1313 रुग्ण आढळले आहेत.