मुंबई : परळ येथील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटलमध्ये अजून एक मापदंड तयार केला गेला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यकृत, पोट आणि मुत्रपिंडासह कुल्हे हे अवयव जुळलेल्या जुळ्यांवर या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून त्यांना विलग करण्यात आले. या दोन्ही जुळ्यांमध्ये यकृत, आतडे आणि मूत्राशय हे अवयव समान होते. ही अत्यंत अनन्यसाधारण शस्त्रक्रिया होती. या शस्त्रक्रियेचे नियोजन २० डॉक्टरांनी केले आणि ही शस्त्रक्रिया तब्बल १२ तास चालली. १२ डिसेंबर रोजी ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली.



अशी केली शस्त्रक्रिया?


गर्भावस्थेच्या २४ व्या आठवड्यात सीतल झाल्टे यांच्या गर्भात जुळलेली जुळी बाळे असल्याचे निदान नवरोजी वाडिया प्रसूती रुग्णालयात करण्यात आले. प्रसूतीआधी या जुळ्यांची वैद्यकीय परिस्थिती कशी आहे, याविषयी त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर वाडिया हॉस्पिटलमध्ये झाल्टे यांची प्रसूती प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. वाडिया हॉस्पिटलमध्ये १९ सप्टेंबर २०१६ रोजी लव आणि प्रिन्स यांचा जन्म झाला. त्यानंतर प्रत्येक फॉलोअप सत्रासाठी लव आणि प्रिन्सला घेऊन येण्याची जबाबदारी झाल्टे कुटुंबियांनी पार पाडली आणि त्यांच्यावरील शस्त्रक्रियेआधी अत्यंत व्यापक प्रमाणावर चाचण्या व तापासण्या करण्यात आल्या. 



"१ वर्ष ३ महिन्यांच्या अत्यंत नाजूक वयात लव आणि प्रिन्स यांच्यावर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सध्या बालअतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आले आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल आणि त्यानंतर त्यांच्यावर विविध शस्त्रक्रिया करण्यात येतील, जेणेकरून ते सुदृढ आयुष्य जगू शकतील. या दोन्ही बाळांच्या आतील अवयवांवर त्वचा बसविणे हे सर्वात मोठे आव्हान होते.", असे वाडिया हॉस्पिटलच्या सीईओ डॉ. मिनी बोधनलवाला म्हणाल्या.


यापूर्वी रिद्धी आणि सिद्धी यांच्यावरही वाडिया हॉस्पिटलमध्ये अशीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि आता लव व प्रिन्स यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. लव आणि प्रिन्स यांचा जन्म वाडिया हॉस्पिटलमध्येच झाल्याने त्यांच्या शस्त्रक्रियेचे नियोजन करणे तुलनेने सोपे होते, ही दोन्ही बाळे सुदृढ होईपर्यंत त्यांची काळजी घेण्यात येईल व त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. इतकी दुर्मीळ शस्त्रक्रिया होऊनही दोन्ही बाळांची प्रकृती स्थिर असल्याचे पाहून झाल्टे कुटुंबिय सध्या अत्यंत आनंदात आहेत.