इथे 3 दिवसात 14 लाख कोरोना रुग्ण, या कारणाने येऊ शकते भारतात चौथी लाट?
कोरोनाने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. चीनसह अनेक देशांमध्ये संसर्ग पसरत आहे.
Corona Update : चीनसह अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या प्रकरणांमुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. भारतातही तज्ज्ञ चौथ्या लाटेचा (Corona Fourth Wave) अंदाज व्यक्त करत आहेत. युरोप आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये कोरोनाचा वेग पुन्हा वाढला आहे. चीनमध्ये ( Corona Cases in China) 14 महिन्यांनंतर कोरोनाने दोघांचा बळी घेतला आहे.
त्याच वेळी, हाँगकाँगमध्ये (Hong Kong) कोरोनाची एकूण प्रकरणे 10 लाखांच्या पुढे गेली आहेत, त्यापैकी 97% प्रकरणं कोरोनाच्या आताच्या लाटेत समोर आली आहेत. या ठिकाणी कोरोनाने आतापर्यंत 5,401 लोकांचा बळी घेतला आहे. 2019 मध्ये चीनमध्ये संसर्गाचा उद्रेक झाल्यापासून (4,636) ही मृत्यू संख्या जास्त आहे.
एका आठवड्यात 30 टक्क्यांनी वाढ
दक्षिण कोरियात (South Korea) परिस्थिती बिकट बनली आहे. इथं कोरोनाच्या एकूण रुग्णांनी 90 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यापैकी १६ टक्के म्हणजे गुरुवार ते शनिवार या तीन दिवसांत सुमारे 14 लाख प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. युरोपमध्ये फ्रान्स, इंग्लंड आणि इटलीमध्ये एका आठवड्यात प्रकरणांमध्ये 30% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत जगभरातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या सरासरी सुमारे 12% वाढली आहे.
WHO ने दिला इशारा
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने खबरदारीचा इशारा दिला आहे. आताची परिस्थिती ही केवळ हिमनगाचं टोक आहे, परिस्थिती दिसते त्यापेक्षा जास्त भयावह आहे, असं WHO ने म्हटलं आहे. WHO च्या मते कोरोना महामारी इतक्या लवकर संपणार नाही. निष्काळजीपणा आणि चुकीच्या सूचना ही रुग्णसंख्या वाढण्यामागे प्रमुख कारणं आहेत. यात सर्वात मोठी चुकीची माहिती म्हणजे ओमायक्रॉन (Omicron) घातक नाही, ओमायक्रॉनला हलक्यात घेणं चुकीचं आहे. महामारी अजून संपलेली नाही, ज्यांचं संपूर्ण लसीकरण झालेलं नाही असे लोक कोरोनाच्या विळख्यात येत आहेत, असं WHO ने म्हटलं आहे.
आंतरराष्ट्रीय उड्डाणांमुळे अडचणी वाढणार
27 मार्चपासून देशात आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत. त्यामुळे भारतातही चौथ्या लाटेची भीती असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणे आहे. असं असलं तरी डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत बहुतेक लोकांमध्ये अॅण्टीबॉडिज तयार झाल्या आहेत. मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण करण्यात आले आहे. अशा स्थितीत चौथी लाट अत्यंत धोकादायक असण्याची शक्यता कमी असली तरी काळजी घेणे गरजेचे आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.