कोरोनावर ही आहेत औषधं, रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार
कोरोनाशी लढा देण्यासाठी आता या औषधांचा वापर करण्यात येणार आहे.
मुंबई / नाशिक : कोरोनाशी लढा देण्यासाठी आता या औषधांचा वापर करण्यात येणार आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत सर्वसामान्यांसाठी कोविड -१९ साठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी विषयक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर, टास्क फोर्स ऑन आयुष्य फॉर कोविड-१९ गठीत करण्यात आला होता. त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय तसेच अलक्षणिक रुग्णांवरील उपचारासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.
सामान्य प्रतिबंधात्मक उपाय :
- वैयत्तिक स्वच्छतेचे पालन करणे.
- वारंवार साबणाने हात २० सेकंदापर्यंत धुणे
- खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा
- ज्या व्यक्ती आजारी आहेत किंवा ज्यांना सर्दी खोकला इत्यादी आजाराची लक्षणे आहेत, अशा व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळावा.
- जिवंत प्राण्यांशी संपर्क व कच्चे न शिजवलेले मांस खाणे टाळा.
- पशुपालन गृह तसेच जिवंत पशु विक्री केंद्र किंवा कत्तलखाने या ठिकाणी प्रवास टाळावा
आयुष उपाययोजना पुढीलप्रमाणे
- ताजे, उष्ण व पचायला हलके भोजन घ्यावे. भोजनात अख्खी आणि ऋतूनुसार भाज्यांचा समावेश असावा
- तुळशीची पाने, ठेचलेले आले व हळद ही द्रव्ये पाण्यात उकळून ते पाणी वारंवार पिणे फायदेशीर आहे.
- सर्दी व खोकल्यासाठी चिमूटभर काळी मिरी, चूर्ण मधातून सेवन करणे फायदेशीर आहे.
- कोविड-१९ लक्षणांमध्ये तुळस, गुळवेल, आले आणि हळद या सामान्य औषधी वनस्पती उपयुक्त आहेत.
- थंड, फ्रिज मध्ये ठेवलेले व पचायला जाड असलेले पदार्थ टाळावे.
- थंड वाऱ्याचा थेट संपर्क टाळावा.
- विश्रांती व वेळेत झोप हितकारक आहे.
- प्रशिक्षित योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने व प्राणायाम करावे.
- मुगाचे कढण / सूप / पाणी - मुगडाळ पाण्यात उकळून तयार केलेले मुगाचे गरम कढण / सूप / पाणी प्यावे, ते पोषक आहे.
- सुवर्ण दुग्ध / दुग्ध - १५० मिलीमीटर गरम दुधात अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा सुंठीचे चूर्ण मिसळून हे दूध दिवसातून एकदा किंवा दोनदा प्यावे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी
आयुर्वेदिक औषधी
- संशमनी वटी १ गोळी दिवसातून दोनदा असे १५ दिवस
- तुळस चार भाग, सुंठ दोन भाग, दालचिनी दोन भाग व काळी मिरी एक भाग या द्रव्याच्या भरड चूर्ण तयार करणे. वरील औषधीचे तीन ग्रॅम भरड चूर्ण १०० मिलिलिटर उकळलेल्या पाण्यात मिसळून ५-७ मिनिटे ठेवणे व नंतर हे पाणी पिणे.
- च्यवनप्राश १० ग्रॅम सकाळी सेवन करणे (मधुमेही रुग्णांनी साखरविरहित च्यवनप्राश सेवन करावे.
- सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळ तेल / खोबरेलतेल किंवा हे बोटाने लावावे.
- तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळतेल/ खोबरेलतेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात व नंतर हे तेल थुंकावे व गरम पाण्याने चूळ भरावी असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे.
युनानी औषधी
- बिहिदाना ५ ग्रॅम, बर्गे गावजबान ७ ग्रॅम, उन्नाब ७ दाने, , सपिस्तान ७ दाने, दालचिनी ३ ग्रॅम, बनपाशा ५ ग्रॅम यांचा काढा करून २५० मिलिलिटर पाण्यामध्ये १५ मिनिटे उकळावे व गरम असताना चहाप्रमाणे दिवसातून १ किंवा २ वेळा १५ दिवसांकरिता घ्यावे.
- खमीरा मरवारीद दुधासोबत ५ ग्रॅम दिवसातून दोनदा घ्यावे. मधुमेही रुग्णांनी घेऊ नये.
होमिओपॅथी औषधी
- आर्सेनिकम अल्बम ३० : ४ गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्यावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करावा.
कोविड-१९ सारखी लक्षणे असणाऱ्यांसाठी
आयुर्वेदिक औषधी
- टॅबलेट आयुष्य ६४ - (५०० मिलिग्रॅम) दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे
- अगस्त्य हरितकी - ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस घ्यावे.
- अणुतेल - तीळतेल - दोन थेंब प्रतिदिन सकाळी नाकपुडीत टाकणे.
- ताजी पुदिन्याची पाने किंवा ओवा पाण्यात उकळून त्याची वाफ दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्यावी.
- खोकला व घास खवखवत असल्यास साखर अथवा मध यामध्ये लवंग चूर्ण मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.
युनानी औषधी
- अर्धा ग्लास पाण्यामध्ये आरके अजिब ५ थेंब मिसळून गुळण्या कराव्यात, असे १५ दिवस करावे.
- तिर्यक अर्बा - हब्बूल घर, ज्यूतिआना, मूर झरवंद तविल या सर्व घटकांचे चूर्ण तयार करून तुपामध्ये परतावे व मध गरम करून त्यामध्ये ही औषधे मिसळावीत. याचा वापर चूर्ण स्वरूपातही करता येतो, हे औषध १५ दिवस घ्यावे.
होमिओपॅथिक औषधी
- आर्सेनिकम अल्बम ३० - ४ गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्यावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करावा.
- तसेच ब्रायोनिया अल्वा, हस टॉक्सिको डेन्ड्रॉन, बेलॉडोना जेलसेमियम, युप्याटोरियम, परफॉलीएटम ही औषधे देखील सर्दी खोकला, फ्लू समान रोगांमध्ये चिकित्सेसाठी उपयुक्त्त ठरली आहेत.
(टीप - वरील सर्व औषधे तज्ज्ञ आयुर्वेदिक , युनानी आणि होमिओपॅथी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावीत )
कोविड-१९ पॉझिटिव्ह, अलक्षणिक असणाऱ्यांसाठी उपचार
आयुर्वेदिक औषधी
- टॅबलेट आयुष्य ६४ - (५०० मिलिग्रॅम) दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे किंवा टॅबलेट सुदर्शन घनवटी - २५० मिलिग्रॅम दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे.
- अगस्त्य हरितकी - ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस घ्यावे.
- अणुतेल - तीळतेल - दोन थेंब प्रतिदिन सकाळी व संध्याकाळी नाकपुडीत टाकणे.
- तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळतेल/ खोबरेलतेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात व नंतर हे तेल थुंकावे व गरम पाण्याने चूळ भरावी असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे.
- गरम पाण्याची वाफ वाफ दोनदा किंवा तीनदा घ्यावी.
होमिओपॅथिक औषधी
- कोविड -१९ समान रोगांच्या लक्षणांच्या चिकीत्सेकरिता नमूद औषधांचा वापर हा प्रस्थापित चिकीत्सेस पूरक चिकित्सा म्हणून केला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व औषधे तज्ञ आयुर्वेदिक व होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावे.
- कोविड -१९ या संसर्गजन्य आजाराची लक्षणे जाणविल्यास तात्काळ चाचणी करून घेणे व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक राहील.