दिल्ली : चीन आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. ज्यामुळे जगावर पुन्हा एकदा कोरोनाचं नवं संकट उभं राहत आहे. कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावासाठी नवा व्हेरिएंट कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे देशावरून अजूनही कोरोनाचं संकट टळलेलं नाही. अशातच कोरोनाची लाट पुन्हा येऊ शकते असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आठवड्यात, जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला होता की जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणं वाढतायत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर भारताने विशेषत: सतर्क राहिलं पाहिजे.


सर्वात संसर्गजन्य 'स्टिल्थ ओमायक्रॉन व्हेरिएंट' चीनमध्ये पसरला आहे. त्यामुळे या ठिकाणी दिवसेंदिवस कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होतेय. जानेवारी 2021 नंतर या आठवड्यात चीनमध्ये कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला आहे.


तज्ज्ञांचा सावधतेचा इशारा


एका वेबसाईटशी बोलताना तज्ज्ञ सुभाष साळुंखे म्हणाले, तिसऱ्या लाटेमध्ये देशातील नागरिकांची इम्युनिटी वाढली आहे. त्याचप्रमाणे देशातील अनेक राज्यांमध्ये लसीकरण मोहीम जोरात सुरु आहे. त्यामुळे अधिक चिंता करण्याची गरज नाही. 


चिंतेच कारण नसलं तरीही आपण बेजबाबदारपणे वागून चालणार नाही. कारण भारतात चौथी लाट येऊ शकते, जसं जगातील अनेक देशांमध्ये आली आहे. चौथी लाट नेमकी कधी येईल आणि ती किती तीव्र असेल याबाबत अजून कल्पना नसल्याचं, साळुंखे यांनी सांगितलं आहे.


कोरोनाचं 50 पेक्षा अधिक म्युटेशन


कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचे 50 हून अधिक म्यूटेशन झाले आहेत. जगभरात या व्हेरिएंटने संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. भारतात सध्या कोरोनाच्या चौथ्या लाटेची कोणतीही परिस्थिती दिसत नसली, तरी काळजी घेण्याची अधिक गरज आहे, असं एक्सपर्टचं मत आहे.