मुंबई : सध्या कोरोनाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतेय. अशातच आता वातावरणातील बदलामुळे गेल्या काही दिवसांमध्ये ताप, सर्दी आणि खोकल्याचे रूग्ण वाढतायत. रूग्णालयाच्या ओपीडीमध्येही वातावरण बदलाच्या साथीमुळे रूग्णसंख्या वाढली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य म्हणजे व्हायरलची लक्षणं आणि कोरोनाची लक्षणं सारखीच असल्यामुळे नागरिकांमध्येही गोंधळ उडाला आहे. काही जणं कोरोनाची लक्षणं ही वातावरण बदलामुळे असल्याने कोरोना चाचणी करू घेत नाहीत. 


मुंबईतील केईएम रूग्णालयाच्या कान, नाक, घसा विभागाच्या युनिट हेड डॉ. निलम साठये म्हणाल्या, "गेल्या काही दिवसांपासून सर्दी, ताप आणि खोकल्याचे रूग्ण वाढले आहेत. केईएम रूग्णालयात जवळपास 40 टक्क्यांनी रूग्ण वाढले आहेत. यावेळी ज्य व्यक्तींना साधारण उपचार देऊन बरं वाटत नाहीये त्यांना कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला देण्यात येतोय." 


जर एखाद्याला दोन ते तीन दिवस ताप, सर्दी किंवा डोकेदुखी असेल तर चाचणीसाठी टाळाटाळ न करण्याचं आवाहन डॉक्टरांकडून आवाहन केलं जातंय.


मुंबईतील सेंट जॉर्ज रूग्णालयातील कान-नाक-घसा विभागातील डॉ. राहुल कुलकर्णी म्हणाले की, "सध्या व्हायरलचे रूग्ण वाढले आहे. आमच्याकडे येणाऱ्या रूग्णांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. थोडीही लक्षणं दिसून आल्यावर आम्ही त्यांना वेगळं राहण्याचा सल्ला देतो. तसंच इतरांनाही लक्षणं आढळून आल्यावर तातडीने चाचणी करून घ्या."


भारतात कोरोनाची आकडेवारी


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये देशात तब्बल 90,928 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यापैकी 19,206  रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर, 325 रुग्णांचा या विषाणूच्या संसर्गामुळं मृत्यू झाला. सध्या देशात कोरोना पॉझिटीव्हीटी रेट 6.43 टक्के असल्याचं कळत आहे.