राज्यावर कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका? मुंबईची परिस्थिती सर्वात बिकट
गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे 1881 नवीन रुग्ण आढळले आहेत.
मुंबई : कोरोनाला हलक्यात घेत असाल तर तसं करू नका, कारण महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. मुंबई आणि परिसरात कोरोना संसर्गाचा दर वाढल्याचं दिसून आलं आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात कोरोनाच्या बाबतीत 350 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
याशिवाय ठाणे 192 टक्के आणि मुंबईमध्ये 136 टक्क्यांनी कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. आकडेवारी पाहिली तर, गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे 1881 नवीन रुग्ण आढळले आहेत. दिवसागणिक वाढणारी कोरोनाची संख्या पाहता चौती लाटेची भीती व्यक्त करण्यात येतेय.
कोरोना वाढती संख्या पाहता परिस्थिती पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला कोरोनाच्या प्रोटोकॉलचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, लोकांनी योग्य प्रकारे मास्क लावावा आणि लस घ्यावी.
मुंबईत सर्वाधिक रुग्ण
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत शहरात आहेत. गेल्या चोवीस तासात मुंबईत 1242 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या 5974 सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोनाचे रुग्ण तरुण वयोगटातील
कोरोनाचे नवे रुग्ण हे 35 ते 45 वर्षे वयोगटातील असल्याचं दिसून येत आहे. (Corona cases, youth, Mask use) तिशी ओलांडलेल्या वयोगटामध्ये संसर्गाचं प्रमाण पाहता सध्या सार्वजनिक आणि खासगी रूग्णालयात कोरोनाचे उपचार घेणाऱ्या तरूणांची संख्या अधिक आहे.
कोरोनाच्या संसर्गाचं हे रुप पाहता सार्वजनिक ठिकाणी वावरताना तरूणांनी मास्क लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. वेगवेगळ्या कारणांनी बाहेर जाणाऱ्या, प्रवास करणाऱ्या, तसंच गर्दीत वावरणाऱ्या वयोगटात या विषाणूचा संसर्ग अधिक असल्याचं दिसून आलं आहे.