Corona ची लस हृदयासाठी धोकादायक? केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल
देशातल्या नागरिकांमधला हाच संभ्रम दूर करण्यासाठी ICMR नं संशोधन सुरु केलंय. ICMR नं यासाठी देशातील वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधून डेटा गोळा करायला सुरुवात केलीय
Corona Vaccine Dangerous For Heart : कोरोनाच्या लसीबद्दल (Corona Vaccine) नागरिकांमध्ये संभ्रम आहे. कोरोनाची लस घेतल्यामुळे हार्ट अटॅक (Heart Attack) येतो असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे अनेक नागरिक घाबरून कोरोना लस घेत नाहीत. देशातल्या नागरिकांमधला हाच संभ्रम दूर करण्यासाठी ICMR नं संशोधन सुरु केलंय. ICMR नं यासाठी देशातील वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधून डेटा गोळा करायला सुरुवात केलीय. यामध्ये खालील प्रश्नांचा समावेश होता-
कोरोना लसीमुळं हार्ट अटॅकचा धोका?
2 वर्षात किती लोकांना हार्ट अटॅक आले?
हार्ट अटॅक आलेल्यांपैकी किती जणांना कोरोनाची लागण झाली होती?
हार्ट अटॅक आलेल्या किती लोकांनी कोरोनाची लस घेतली होती?
कोरोनाची कोणती लस घेतली होती?
याबाबतचा डेटा गोळा करण्याचं काम सुरु आहे. कोरोना लस घेतल्यामुळे हार्ट अटॅक येतो ही लोकांमधली भीती दूर करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
एक वेळ होती की देशात कोरोना लस कधी तयार होणार याची लोकं आतुरतेनं वाट पाहात होती. कोरोना लस बाजारात आली तेव्हा ती घेण्यासाठी तुडुंब गर्दी होत होती.. आज कोरोना लस मुबलक प्रमाणात आणि कमी दरात उपलब्ध आहेत. पण लसीबद्दल निरनिराळ्या शंका निर्माण होतायत. त्यामुळेच लोकांमधली भीती दूर करण्यासाठी केंद्र सरकारसह आयसीएमआरनं पुढाकार घेतलाय..
बूस्टर डोसबाबत नवा अभ्यास
बूस्टर डोसबाबत एक नवीन अभ्यास समोर आला आहे. ज्यामध्ये बूस्टर डोस (Booster Dose) सुरक्षित आहे की नाही हे सांगण्यात आले आहे. याशिवाय बूस्टर डोसचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो? असा दावाही संशोधनात करण्यात आला आहे. बूस्टर डोसवरील हा अभ्यास तेल अवीव विद्यापीठाने इस्रायलमधील सुमारे 5 हजार लोकांवर केला आहे. हा अभ्यास लॅन्सेट या सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. अभ्यासादरम्यान, लोकांना स्मार्ट घड्याळे घालायला लावली गेली आणि नंतर डेटा गोळा केला गेला. तेल अवीव विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात बूस्टर डोस सुरक्षित असल्याचे वर्णन केले आहे.
Booster डोसचा हृदयावरील परिणाम काय आहे?
बूस्टर डोसच्या आधी आणि नंतर हृदयाच्या ठोक्यांची तुलना केली गेली. अभ्यासात असे दिसून आले की लसीचे दोन डोस घेतल्यानंतर हृदयाचे ठोके वाढले होते. परंतु बूस्टर डोस घेतल्यानंतर हृदयाचे ठोके पुन्हा लसीकरणापूर्वीच्या गतीवर आले. हे दर्शवते की बूस्टर डोस सुरक्षित आहे. त्यांनी सांगितले की, असे काही लोक होते ज्यांना लस घेतल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत. स्मार्टवॉचच्या डेटावरून दिसून आले. तथापि, त्याच्या शरीरात बदल निश्चितपणे दिसून आले.