मुंबई : देशावरून कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेला सुरुवात करण्यात आली. तर आता या लसीकरण मोहीमेला वेग मिळत असून भारतात लवकरच अजून एक लस उपलब्ध होणार आहे. मुख्य म्हणजे ही लस नाकावाटे दिली जाणार आहे.


भारत बायोटेक विकसित करतेय लस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही लस भारत बायोटेक विकसित करत आहे. या लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी कंपनीला मान्यता मिळाली आहे. क्लिनिकल चाचण्यांसाठी नियामक मान्यता प्राप्त झाली आहे. जैवतंत्रज्ञान विभागाने (डीबीटी) सांगितले की, या औषधाच्या चाचणीचा पहिला टप्पा 18 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांवर करण्यात आला. जो पूर्ण यशस्वी झाला आहे.


नाकावाटे दिली जाणारी पहिली लस


DBTच्या म्हणण्याप्रमाणे, भारत बायोटेककडून नाकाद्वारे दिली जाणारी ही पहिली लस आहे. ज्याला दुसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांसाठी नियामक मान्यता मिळाली आहे. यासह, डीबीटीने एका निवेदनात म्हटलं आहे की, कंपनीला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी मंजुरी मिळाली आहे. अशा प्रकारची ही पहिली कोरोना लस आहे, जी भारतातील लोकांवर ट्रायल होणार आहे. कंपनीला त्याचं तंत्रज्ञान सेंट लुईसमधील वॉशिंग्टन विद्यापीठातून मिळालं आहे.


पहिल्या टप्प्यात कोणतेही दुष्परिणाम नाहीत


DBTच्या म्हणण्याप्रमाणे, कंपनीकडून दावा करण्यात आला आहे की, पहिल्या टप्प्यातील चाचणीमध्ये सहभागी लोकांच्या शरीराने लसीचा डोस सहज स्वीकारला. कोणतेही दुष्परिणाम यावेळी दिसून आले नाहीत. 'ही लस पूर्वीच्या अभ्यासातही सुरक्षित आढळली आहे. प्राण्यांवरील अभ्यासात ही लस उच्च पातळीवरील अंटीबॉडीज तयार करण्यात यशस्वी झाली होती.