नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने कहर केला आहे. संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला असून जगभरात हे चिंतेचं कारण ठरतंय. अनेक देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढतेय. भारतातही याच्या संख्येत वाढ होतेय. हा व्हायरस पसरण्यामागे अनेक कारणं, अनेक प्रकारचे अंदाज लावले जात आहेत. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेकडून WHO याबाबतचे संभ्रम आणि  वास्तविकता समोर आणली जातेय. सोशल मीडियावरुन एक दावा करण्यात आला की, हा विषाणू हवेतून पसरतोय. त्यामुळे येणाऱ्या काळात संसर्गाची मोठी शक्यता आहे. अशाप्रकारच्या दाव्यामुळे अनेकांमध्ये भीतीचं आणि तितकंच गोंधळाचं वातावरण आहे. मात्र, याबाबतचं सत्य, वास्तविकता जागतिक आरोग्य संघटनेने समोर आणली आहे.


कोरोना विषाणू हवेतून पसरत नाही -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना विषाणू हवेतून पसरतो की नाही याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने एक माहिती शेअर केली आहे. यापूर्वी WHO कडून अशा प्रकारच्या अनेक बाबी नाकारल्या गेल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने ट्विट करत, कोरोना व्हायरस केवळ सरफेस म्हणजेच पृष्ठभाग किंवा ड्रॉपलेट म्हणजे सर्दी-खोकल्यामधून उडणारे द्रव्याचे अंश किंवा थुंकी यातून हा व्हायरस एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. संसर्ग असलेल्या एका व्यक्तीकडून, दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानेच कोरोनाचा धोका आहे.


स्वस्थ व्यक्तीला कसा संसर्ग होतो -


कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या ड्रापलेट्सच्या संपर्कात आल्याने, दुसरा जो स्वस्थ व्यक्ती आहे त्याला संसर्ग होण्याचा धोका आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीने खोकताना, शिंकताना, बोलताना मास्क न घातल्यास त्यावेळी, दुसऱ्या स्वस्थ व्यक्तीला हा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे योग्य ते अंतर राखणं गरजेचं आहे.


या व्हायरसचं दुसरं मुख्य कारण म्हणजे, पृष्ठभाग आहे. यामुळे संसर्ग अधिक लवकर पसरतो. खोकताना किंवा शिंकताना ड्रॉपलेट्स जर कोणत्याही पृष्ठभागावर पडले आणि स्वस्थ व्यक्ती त्याच्या संपर्कात आल्यास, स्वस्थ व्यक्तीलाही या व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे खोकताना, शिंकताना तोंडावर मास्क, रुमाल ठेवणं अत्यावश्यक आहे.



कोरोनापासून बचावासाठी योग्य उपाय -


- संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून कमीत कमी 1 मीटरचं अंतर ठेवा
- कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्यानंतर हात साबण, पाणी किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करा. (कमीत कमी 20 ते 30 सेकंद)
- कोणत्याही वस्तूला हात लावल्यानंतर किंवा एखाद्याला हात मिळवल्यानंतर, ते हात तोंड, डोळे, नाकाला लावू नका. इतरांना हात मिळवणं टाळा.
- या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी घरातच राहा. अत्यावश्यक गरज असल्याशिवाय रस्त्यावर उतरु नका. इतरांच्या संपर्कात येऊ नका.
- पृष्ठभाग वारंवार निर्जंतुक करा