मेडिकलमध्ये मिळणार लस? कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन `या` किंमतीत
कोविशील्ड, कोव्हॅक्सीन खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार, सरकारच्या निर्णयाकडे लक्ष
COVID-19 Vaccine: भारतातील कोरोना व्हायरसच्या (Corona) तिसऱ्या लाटेचा (Corona Third Wave) प्रभाव कमी करण्यात लसीची महत्त्वाची भूमिका आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute Of India) आणि भारत बायोटेक (Bharat Biotech) या दोन लस निर्मात्या कंपन्यांनी आता सरकारकडून त्यांच्या लसींसाठी खुल्या बाजारात विक्रीसाठी मान्यता मागितली आहे.
कोरोना विषाणूविरोधात तयार करण्यात आलेली Covaxin आणि Covishield लस लवकरच मेडिकल स्टोअरमध्ये विक्रीसाठी दिसू शकतात. DCGI च्या सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीनं (SEC) कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन लस खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी केल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, या लस खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या तर त्याच्या किंमताबाबत खुलासा करण्यात आला आहे.
किती असणार लसीची किंमत
अधिकृत सत्रांनी दिलेल्या माहितीनुसार Covishield आणि Covaxin खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्यास, त्यांची किंमत प्रति डोस 275 रुपये निश्चित केली जाऊ शकते. तसंच लसीच्या डोसवर 150 रुपये अतिरिक्त सेवा शुल्क देखील आकारलं जाईल. म्हणजेच एका लसीच्या डोसची किंमत खुल्या बाजारात सुमारे 425 रुपये असण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय औषध नियामक प्राधिकरणाला (NPPA) लसीची किंमत सर्वसामान्यांना परवडावी यासाठी किंमत निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या खाजगी रुग्णालयांमध्ये कोवॅक्सिनच्या एका डोसची किंमत 1,200 रुपये आणि कोविशील्डची किंमत 780 रुपये प्रति डोस ठेवण्यात आली आहे. यामध्ये 150 रुपये सेवा शुल्क देखील समाविष्ट आहे.
दोन्ही कंपन्यांना तयार करावी लागणार यंत्रणा
दोन्ही लसीला (Corona Vaccine) भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. सरकारने मान्यात दिल्यास सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांना देशभरात वितरण व्यवस्था तयार करावी लागणार आहे. त्यानंतर या कंपन्या लस सर्व रुग्णालये आणि मेडिकल स्टोअरमध्ये विक्री करु शकतील.
मेडिकल स्टोअर्समधून लस विकत घेता येणार
या निर्णयामुळे अद्याप कोणाला लसीचा डोस मिळाला नसेल, तर त्याला रुग्णालयात जाण्याची गरज नाही. तो व्यक्ती जवळच्या मेडिकल स्टोअरमधून लस विकत घेऊन कोणत्याही डॉक्टरकडून ती टोचून घेऊ शकतो. यामुळे देशात लसीकरणाचा वेगही वाढेल आणि सरकारवरील भारही कमी होईल. बाजारात या लसींची किंमत किती असेल, हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.