लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी होतेय गर्दी!
राज्यात आता नागरिक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी प्रतिसाद देत आहेत.
मुंबई : कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यात लसीकरणाचा वेग काही प्रमाणात मंदावला असल्याचं दिसून आलं होतं. मात्र आता पुन्हा नोव्हेंबर महिन्यात नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी गर्दी करत असल्याचं समोर आलं आहे.
राज्यात आता नागरिक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी प्रतिसाद देत आहेत. गेल्या दहा दिवसात सुमारे 30 लाख नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याची नोंद आहे.
ऑक्टोबर महिन्यात लसीकरण कमी झालं होतं. हेच प्रमाण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणखी घटलं. याशिवाय दिवाळीपूर्वी अडीच ते तीन लाख नागरिकांना लस देण्यात आली.
दिवाळीच्या दिवसांत नागरीक लसीकरणासाठी फारसं पुढे आले नाहीत. त्यामुळे लसीकरणाचा आकडा खाली आल्याचं म्हटलं जातंय. तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून लसीकरणाने हळूहळू वेग घेतला आणि तिसऱ्या आठवड्यात हा आलेख सात लाखांपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे.
गेल्या दहा दिवसांची माहितीप्रमाणे राज्यात जवळपास 24 लाख नागरिकांनी लसीचा पहिली तर सुमारे 30 लाख नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे आता दिवाळीनंतर पुन्हा गर्दी वाढली आहे.
तसंच ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात राज्यात लसीकरण झालं होतं. सध्याच्या घडीला राज्यात सुमारे 77 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 38 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.