Omicron New Variant: चिंता वाढली, `या` देशात सापडला कोविडचा नवा घातक व्हेरिएंट
जगभरात ओमायक्रॉनने थैमान घातलं असतानाच नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे
Omicron New Variant: ओमायक्रॉन (Omicron) हा आतापर्यंतचा सर्वात वेगाने पसरणारा कोरोना व्हेरिएंट (Corona) असल्याचं म्हटलं जातं. तर डेल्टाने (Delta) गेल्या वर्षी अनेक देशांमध्ये कहर केला होता. अशा परिस्थितीत ओमायक्रॉन आणि डेल्टाचं संमिश्र स्वरुप किती धोकादायक असू शकतं याचा अंदाज येऊ शकतो. सायप्रसच्या एका संशोधकाने हा नवीन स्ट्रेन शोधला आहे, जो ओमिक्रॉन आणि डेल्टाचा संमिश्र स्वरुप असल्याचा दावा केला आहे.
सायप्रस विद्यापीठातील जीवशास्त्राचे प्राध्यापक लिओनडिओस कोस्ट्रिक्स यांनी ओमायक्रॉन सारखी अनुवांशिक वैशिष्ट्ये आणि डेल्टा सारखी जीनोम यामुळे याला 'डेल्टाक्रॉन' (Deltacron) असं नाव दिलं. अहवालानुसार, सायप्रसमध्ये आतापर्यंत डेल्टाक्रॉनचे 25 रुग्ण आढळले आहेत. हा व्हेरिएंट किती प्राणघातक आहे आणि त्याचा परिणाम काय होईल हे सांगणे सध्या कठिण आहे.
नवा व्हेरिएंट किती अधिक संसर्गजन्य आहे आणि तो पूर्वीच्या दोन मुख्य स्ट्रेनपेक्षा किती प्रभावी आहे याचा शोध घेतला जात असल्याचं प्राध्यापक कोस्ट्रिक्स यांनी म्हटलं आहे. या प्राध्यापकांनी त्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय संस्थेला पाठवले आहेत.
अमेरिकेत दररोज सरासरी सहा लाख नवीन संक्रमित
ओमायक्रॉन जगभरात धुमाकूळ घालत असतानाच डेल्टाक्रॉन व्हेरिएंटचा शोध लागला आहे. अमेरिकेती गेल्या सात दिवसात सरासरी ६ लाखांहून अधिक नवीन संसर्ग आढळून आले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ७२ टक्के प्रकरणांची वाढ झाली आहे.