लहान मुलांमध्ये वाढतायत डेंग्यू-मलेरियाची प्रकरणं; प्रतिबंधात्मक उपाय अवलंबण्याचा तज्ज्ञांचा इशारा
पावसाळ्यात केवळ प्रौढांनाच नाही तर लहान मुलांनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागते ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पावसाळ्यात 5 ते 15 वयोगटातील मुलांना नाक चोंदणे किंवा मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आरोग्य समस्यांचा अधिक धोका असतो.
डेंग्यू आणि मलेरिया यासारख्या डासांमुळे पसरणाऱ्या रोगांचं वेक्टर-बोर्न रोग म्हणून वर्गीकरण केलं जातं. पावसामुळे 5.15 वयोगटातील मुलांमध्ये आरोग्यविषयक अनेक समस्या दिसून येतात. या दिवसात मुलांना डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, कॉलरा, श्वसन संक्रमण, विषाणूजन्य ताप आणि जठरासंबंधी समस्या असतात ज्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात केवळ प्रौढांनाच नाही तर लहान मुलांनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागते ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पावसाळ्यात 5 ते 15 वयोगटातील मुलांना नाक चोंदणे किंवा मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आरोग्य समस्यांचा अधिक धोका असतो. साचलेल्या पाण्यात (कुंड्या, पाण्याची भांडी, टायर, डबके)ॲनोफिलीस आणि एडिस डासांची उत्पत्ती होते.
हवामानातील बदल, प्रतिकारशक्ती कमी असणं आणि उघड्यावरच्या अन्नपदार्थांचे सेवन यामुळे पचनाच्या समस्या, फ्लू, सर्दी, खोकला आणि विषाणूजन्य ताप या समस्या मुलांमध्ये दिसून येतात. पावसाळ्यात अन्न आणि पाणी दूषित होण्याचा धोका वाढतो ज्यामुळे अनेक मुलांमध्ये पोटदुखी, पोटात कळ येणे, उलट्या होणे आणि जुलाब हे गॅस्ट्रोएन्टेरिटिसचे लक्षणे दिसून येतात तसेच पोट आणि आतड्यांचीही जळजळ होते अशी माहिती पुण्यातील बालरोग आणि नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. वृषाली बिचकर यांनी दिली.
डॉ बिचकर पुढे सांगतात की, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, कॉलरा, खोकला, सर्दी, ब्राँकायटिस आणि दमा यासारखे श्वसनाचे संसर्ग लहान मुलांमध्ये आढळून येत आहेत. निसरड्या जागेत घसरुन पडल्याने होणारे अपघात तसेच जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना बुरशीजन्य संसर्ग, ऍलर्जी, पुरळ, एक्झिमा, अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी आणि सोरायसिस यांसारख्या त्वचेच्या समस्या उद्भवतात. बुरशीजन्य संसर्गाला मायकोसिस असेही म्हणतात. हे यीस्ट आणि मूस सारख्या बुरशीमुळे होते. ही बुरशी वातावरणात सर्वत्र आडळते, ज्यामुळे पावसाळ्यात मुलांमध्ये त्वचेशी संबंधित समस्या होण्याची शक्यता वाढते. बुरशीजन्य संसर्गामध्ये गजकर्ण, ऍथलीट फूट आणि डायपर रॅश यांचा समावेश असू शकतो. त्वचेच्या अनेक समस्यांचा धोका टाळण्यासाठी, मुलांना बाहेरून खेळून आल्यानंतर लगेच स्वच्छ पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो, विशेषत: मुसळधार पावसात.
पावसाळ्यात आपलं मूल निरोगी राहावे यासाठी पालकांनी विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पालकांनी घराजवळ पाणी साचू न देणे तसेच साचणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा करणे गरजेचे आहे. मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावे, घरात मच्छरदाणी वापरावी, संध्याकाळी खिडकी बंद ठेवावी, संतुलित आहार घ्यावा आणि घरच्या घरी व्यायाम करावा.
श्वसन संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी आईस्क्रीम खाणे, कोल्ड ड्रिंक्स पिणे टाळा, माक चोंदण्याची समस्या दूर करण्यासाठी तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार वाफ घ्या, घरी शिजवलेले अन्न खा आणि उकळलेले पाणी प्या, डिहायड्रेशन किंवा डायरिया झाल्यास ओआरएस घ्या आणि रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ टाळा, कच्चे मांस किंवा जंक फूड टाळा. दम्याचा विकार टाळण्यासाठी घर स्वच्छ आणि धूळमुक्त ठेवा आणि आपल्या सोबत इनहेलर बाळगा. जिने, फरशी कोरडी राहिल याची खात्री करा जेणेकरुन पाय घसरून होणारे अपघात टाळता येतील.त्वचेच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी मुलांना कोमट पाण्याने आंघोळ घाला आणि तज्ञांनी सुचवलेली उत्पादनं वापरा, असंही डॉ बिचकर यांनी स्पष्ट केले.