सकाळी शरीरात दिसणारी ही लक्षणं Diabetes चे संकेत; अजिबात दुर्लक्ष करु नका नाहीतर...
Diabetes Signs When You Wake Up In The Morning: अनेकांना आपल्याला मधुमेहाचा त्रास आहे समजण्याआधीच लक्षणं दिसू लागतात. मात्र अनेकजण अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पण असं करणं भविष्याच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकतं. म्हणूनच सतर्क राहणं आवश्यक आहे.
Diabetes Signs When You Wake Up In The Morning: भारतात मागील काही वर्षांपासून मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं अनेक सर्वेक्षणांमधून दिसून आलं आहे. मुळात मधुमेह हा शरीरामधील मेटाबॉलिक प्रक्रिया मंदावल्याने शरीरात पुरेश्याप्रमाणात इन्शुलिन तयार न झाल्याने निर्माण होणारी समस्या आहे. शरीरामध्ये इन्शुलिनचं प्रमाण कमी झाल्याने साखरेचं प्रमाण वाढू लागतं. त्यामुळे मूत्रपिंड, त्वचा, हृदय, डोळे आणि संपूर्ण आरोग्यावरच विपरित परिणाम होतो.
'टाइप वन' आणि 'टाइप टू'चा त्रास कोणाला होतो?
मधुमेह कोणाला होतो यासंदर्भात काही वयोमर्यादा निश्चित नाही. अगदी लहान वयातील मुलांनाही मधुमेहाचा त्रास होऊ शकतो. अनेक तरुणांना टाइप वन डायबेटीजची समस्या असते. तर वयाच्या चाळीशीनंतर सामान्यपणे लोकांना टाइप टू डायबेटीजची समस्या जाणवते. अधिक वयाच्या मधुमेहाच्या रुग्णांमध्ये यकृत आणि हृदयासंदर्भातील आजारांचा धोका वाढवण्याची शक्यता असते.
साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहत नाही
शरीरामधील साखरेचं प्रमाण कायम कमी जास्त होत राहतं. मात्र आपल्याला याची काही कल्पना नसते. यामागील मुख्य कारण म्हणजे इन्शुलिनचं प्रमाण संतुलित असेल तर साखरेचा स्तर संतुलित राहतो. मात्र मधुमेहाची समस्या असलेल्यांमध्ये साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहत नाही. यकृत शरीराला दिवसभर लागणारी साखर रक्तात सोडतं. त्यामुळेच मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांना सकाळी रक्तात जास्त प्रमाणात साखर असल्याचं आढळून येतं. घसा आणि तोंड कोरडं पडणं, रात्रभर अनेकदा लघवीला जावं लागणं, दृष्टीदोष, कमी भूक लागणं यासारखी लक्षणं मधुमेहाचा त्रास असलेल्यांमध्ये दिसून येतात.
वेळीच सल्ला घ्या
अनेकांना आपल्याला मधुमेहाचा त्रास असल्याचं समजण्याच्याआधीच थकवा, झोप न येणे, दृष्टीदोष, फंगल इन्फेक्शन आणि फोड येण्यासारखी लक्षणं दिसू लागतात. अशा व्यक्तींनी शरीरात होणाऱ्या छोट्यामोठ्या बदलांवर लक्ष देण्याबरोबरच वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.
सकाळी दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नको
सकाळी शरीरात दिसणारी लक्षणं दिवसभर दिसत नाहीत असं नाही. खाज येणे, थकवा, दम लागणे, जास्त भूक लागणे, जास्त तहान लागणे यासारख्या समस्यांना केवळ रात्रीच नाही तर दिवसाही तोंड द्यावं लागतं. वजन कमी होणे, जखम भरुन न येणे, गुप्तांगाजवळ खाज येणे यासारख्या समस्या दिवसभर जाणवतात. अशी लक्षणं दिसत असतील तर तातडीने डॉक्टरांची भेट घेऊन आवश्यक त्या चाचण्या करुन घेणं फायद्याचं ठरतं.
अन्य लक्षणं कोणती?
फार भूक लागणे, अचानक वजन कमी होणे, हाता-पायाला मुंग्या येणे, थकवा, दम लागणे, त्वाचा कोरडी पडणे, जखमा लवकर भरुन न येणे, जास्त तहान लागणे, रात्री अनेकदा लघवीला लागणे, केस गळणे यासारख्या गोष्टी टाइप टू टायबेटिजची लक्षणं आहेत. टाइप वन डायबेटिजमध्ये पोटदुखी, उलट्या यासारख्या समस्याही रुग्णांना होतात.
(टीप - वरील माहिती सर्वसामान्य माहिती आणि संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)