Kids using smartphone face mental issues : तुमच्या घरी असलेलं लहान मूल जेवत नसेल किंव रडत असेल तर तुम्ही त्याच्या हातात मोबाईल देऊन मोकळे होता का? आजकाल अनेक घरांमध्ये असं चित्र पहायला मिळतं. मात्र तुम्हाला माहितीये, असं करणं तुमच्या मुलाच्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. मोबाईलच्या अतिरीक्त वापराने तुमचं मूल डिप्रेशनच्या आहारी जाऊ शकतं. यासोबत सततची चिडचिड आणि संताप येण्याची तक्रारही मुलांमध्ये जाणवू शकते. 


का देतात मुलांच्या हाती स्मार्टफोन?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल पालकांमध्ये एक समज असतो, तो म्हणजे सध्या स्पर्धेच्या युगात इतर मुलांपेक्षा आपलं मूल स्मार्ट असलं पाहिजे. स्मार्टफोनच्या वापराने मूल स्मार्ट होईल या विचाराने मुलाच्या हाती स्मार्टफोन दिला जातो. मात्र असं करणं मुलाच्या मानसिक आरोग्यासाठी धोक्याचा इशारा मानला जातोय. 


एका जागतिक सर्वेक्षणातून असं समोर आलंय की, जितक्या लवकर लहान मूल स्मार्टफोनच्या संपर्कात येतं, तेवढाच त्यांना प्रौढ म्हणून मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. या सर्वेक्षणात मुलांबाबत दिसून आलेले परिणाम धोकादायक आहेत. लहान वयात स्मार्टफोन वापरणाऱ्या मुलांमध्ये आत्महत्येचे विचार, इतरांच्या दृष्टीने आक्रमकतेची भावना आणि ते लहान वयात भ्रमनिरास होणं अशा गोष्टी दिसून आल्या. 


स्मार्टफोनमुळे डिप्रेशन?


  • स्मार्टफोनमुळे लहान मुलांना नैराश्य येऊ शकतं

  • मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो

  • त्यामुळे लहान मुलं एकलकोंडी होतात

  • इतरांशी जुळवून घेणं त्यांच्यासाठी अवघड होतं

  • त्यातूनच मुलं चिडीचिडी आणि रागीट बनतात

  • त्यामुळे डिप्रेशनमध्ये जाऊन तुमच्या चिमुरड्यांचं मानसिक स्वास्थ बिघडू शकतं


अमेरिकेतील NGO Sapien Labs ने 40 हून अधिक देशांमध्ये हा अभ्यास केला. या अभ्यासामध्ये, 40 पेक्षा जास्त देशांतील 18 ते 24 वयोगटातील 27,969 प्रौढांकडून डेटा गोळा करण्यात आला. त्यात भारतातील सुमारे 4,000 तरुणांचा समावेश आहे. यामध्ये महिलांना जास्त त्रास झाल्याचे दिसून आलं. 


'एज ऑफ फर्स्ट स्मार्टफोन अँड मेंटल वेलबीइंग आउटकम' अभ्यासाच्या मेंटल हेल्थ कोटिएंट (MHQ) अंतर्गत मानसिक क्षमता आणि दिसून येणारी लक्षणं यांचं मूल्यांकन करण्यात आले. 


सर्व्हेमधून काय समोर आलं?


  • वयाच्या 6 व्या वर्षी पहिला स्मार्टफोन घेतलेल्या 74 टक्के महिलांना मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या अधिक असल्याचं आढळून आलं.

  • वयाच्या 10 व्या वर्षी ज्यांनी स्मार्टफोनचा वापर सुरु केला त्यांना मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या 61% पर्यंत कमी झाल्याचं दिसून आलं. 

  • वयाच्या 15 व्या वर्षी पहिला स्मार्टफोन वापरणाऱ्या तरुणांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित गोष्टी 52% होती. 

  • तर ज्यांना वयाच्या 18 व्या वर्षी स्मार्टफोन मिळाला त्यांच्यापैकी 46% मानसिकरित्या अस्वस्थ असल्याचं दिसून आलं. पुरुषांमध्येही याच गोष्टी दिसून आल्या परंतु त्यांच्यामध्ये ही समस्या कमी होती.

  • गरोदरपणाच्या 9 महिन्यांत आई मोबाईल, टीव्ही आणि गॅजेट्सच्या माध्यमातून काम करते, मग मूलही त्याच सर्व अनुभवांसह जगात येतं.

  • मुलाला जितक्या लवकर स्मार्टफोन दिला जाईल तितक्या लवकर त्याला मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.


एका नवीन अभ्यासामध्ये 40 हून अधिक देशांतील 18 ते 24 वयोगटातील 27,969 प्रौढांचा डेटा गोळा करण्यात आला. ज्यामध्ये भारतातील सुमारे 4,000 जणांचा समावेश आहे. या नव्या अभ्यासातून असं आढळून आलंय की, ज्यांना वयाच्या 18 व्या वर्षी पहिला स्मार्टफोन मिळाला त्या व्यक्ती 46% मानसिकरित्या अस्वस्थ असल्याचं दिसून आलं.


दरम्यान गेल्या वर्षी मे महिन्यात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात असा दावा करण्यात आलाय की, भारतातील तरुण मुलं मोबाइल फोनचा सर्वाधिक वापर करतात. यावेळी इंटरनेटवर मुलं सायबर बुलींग, डेटा प्रायव्हसी, माहिती लीक अशा अनेक प्रकारच्या चुकीच्या गोष्टींना बळी पडतात. दरम्यान इतर देशांच्या तुलनेत भारतात लहान मुलांमध्ये सायबर गुंडगिरीची 5% अधिक प्रकरणं आहेत.