सनबर्नचा त्रास टाळण्यासाठी केवळ सनस्क्रिन नव्हे तर `या` गोष्टी करतील मदत
उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र उन्हामुळे सनबर्न आणि टॅनिंग यासारखी समस्या वाढते.
मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र उन्हामुळे सनबर्न आणि टॅनिंग यासारखी समस्या वाढते. अनेकजण यापासून बचावण्यासाठी सनस्क्रिन लोशनचा वापर करतात. मात्र अशा लोशनच्या वापरासोबतच आहारात काही सकारात्मक बदल केल्यास उन्हाळ्यातील अनेक समस्यांचा त्रास कमी होण्यास मदत होते. याबाबत तज्ञांनी काही खास सल्ला शेअर केला आहे.
कशी घ्याल काळजी ?
तीव्र उन्हात बाहेर पडू नका. दिवसात 12-3 या वेळात सूर्यकिरण तीव्र असतात. सकाळी उन्हात बाहेर पडण्यापूर्वी त्वचेवर किमान 15-20 मिनिटं अगोदर सनस्क्रिन लोशन लावणं आवश्यक आहे. उन्हात खूप वेळ बाहेर पडणार असाल तर 2-3 तासांनी त्वचेवर सनस्क्रिन लोशन लावावे.
सध्या अनेक ठिकाणी ढगाळ वातारण आहे. अशा वातारणामध्येही बाहेर फिरताना सनस्क्रिन लोशन अवश्य लावावे. यामधील युव्ही किरण त्वचेला नुकसानकारक ठरू शकतात. सूर्यकिरणातील घातक किरणांमुळे सनबर्नचा त्रास होण्याचा धोका असतो.
ओठ, कान, टाळू, पाय यांनादेखील सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे. आजकाल ओठांचं आरोग्य जपण्यासाठीदेखील एसपीएफयुक्त लिपबाम बाजारात उपलब्ध आहेत. पायांनादेखील पूर्ण झाकलेल्या शूजने किंवा मोज्यांनी रक्षण करणं आवश्यक आहे. कान, डोकं हे स्कार्फने बांधा. पाय, कान उघडे राहणार असतील तर त्यांनादेखील सनस्क्रीन लोशनने संरक्षित करणं आवश्यक आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत समुद्र किनारी फिरायला जाणार असाल तर सनस्क्रिनचा वापर अवश्य करावा कारण पाण्यात तीव्र सूर्यकिरणांचा त्वचेवर मारा झाल्यास सनबर्नचा त्रास अधिक बळावू शकतो.
उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र उन्हातून घरात आल्यानंतर कुलिंग लोशन किंवा नारळाचं तेल लावायला विसरू नका. सनबर्न झालेल्या भागावर कोरफडीचा गर लावा. यामुळे टॅन आणि स्ट्रेच मार्क कमी करण्यास मदत होते.
व्हिटामिनयुक्त आहाराकडे दुर्लक्ष करू नका. व्हिटॅमिन डीयुक्त आहार म्हणजेच फर्मेटेड कॉड लिव्हर ऑईल शरीरात असलेल्या व्हिटॅमिन डीच्या कामतरतेला नियंत्रणात ठेवते. सोबतच सनबर्नच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी शरीरात खास क्षमता निर्माण करण्यास मदत करते.