मुंबई : गुडघा हा आपल्या शरीरातील एक गुंतागुंतींचा सांधा आहे आणि म्हणूनच त्याला अनेक दुखापतींचा तसेच मोडण्या- तुटण्याचा धोका असतो. अनेकदा, ५० वर्षांपुढील रुग्ण गुडघेदुखी असह्य झाल्याने त्यावर शस्त्रक्रिया हा एकमेव उपचार उरल्याने शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारतात. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्यातून बाहेर येण्याचा (रिकव्हरी) कालावधी व्यक्तीपरत्वे बदलत असून, तो २० दिवस ते दीड महिना इतका असू शकतो. काही रुग्णांबाबत तो तीन महिन्यांपर्यंतही लांबू शकतो. शस्त्रक्रियेनंतर वेदना आणि सूज यांना तोंड देणे रुग्णांसाठी आव्हानात्मक असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपासनी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल, मुलुंडच्या अस्थिरोगतज्ज्ञ आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, डॉ. तेजस उपासनी  यांनी दिलेला हा खास सल्ला नक्की लक्षात ठेवा. 


कोणती काळजी घ्याल ? 


दिवसांतून दोन-तीन वेळा २० मिनिटे गुडघ्यांभोवती बर्फाने शेकावे.


फिजिओथेरपिस्टने सांगितलेले व्यायाम करावे.


ठराविक वेळानंतर थोडे-थोडे चालत राहावे.


शस्त्रक्रियेनंतर पहिले तीन महिने सोफा किंवा कमी उंचीच्या खुर्चीवर बसू नये.


पाय लोंबकळतील अशा अवस्थेत दीर्घकाळ बसणे टाळावे.


डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक साधने (वॉकर अथवा काठी) वापरावीत.


पहिले ६-८ आठवडे कमोड एक्स्टेन्शन आणि आधारासाठी साइड बार्सचा वापर करावा.


सूज आल्यास, तीव्र वेदना झाल्यास, लालसरपणा किंवा काही स्राव आढळल्यास त्वरित डॉक्टरांची भेट घ्यावी.


पाठ ताठ ठेवणारी, बाजूचे हात आणि पाय उंच ठेवण्यासाठी लेग एलिव्हेशन असलेली स्थिर खुर्ची वापरावी.


उंच स्टुलावर चढू नये किंवा पायऱ्या चढू नये.


टाके काढेपर्यंत स्नान करू नये.


स्वत:ला सक्रिय आणि हिंडते-फिरते ठेवावे.


गुडघे वाकवून त्यावर ताण आणू नये.


औषधे: शस्त्रक्रियेनंतर काही आठवडे वेदना होणे सामान्य आहे. याचा सामना करण्यासाठी रुग्णाला वेदनाशामक औषधे दिली जातात. या वेदना काही काळानंतर कमी होतात.


सूज:  गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर काही महिने सूज येणे अत्यंत सामान्य आहे. काही तासांसाठी पाय उंच ठेवण्याचा प्रयत्न करा, यामुळे सूज कमी होण्यास मदत होईल. बर्फाचा शेकही दिवसातून दोन-तीन वेळा घेतला जाऊ शकतो. प्रेशर स्टॉकिंग्ज वापरल्यानेही मदत होते.


फिजिओथेरपी: शस्त्रक्रियेनंतर बरे होण्याच्या काळात रुग्णाला व्यायाम आणि हालचालींच्या स्वरूपात मार्गदर्शन करतो तो फिजिओथेरपिस्ट. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होणे टाळणे, मजबुती परत मिळवणे आणि दैनंदिन आयुष्य पूर्ववत सुरू करण्यात रुग्णाला मदत मिळते. उकिडवे बसणे, उडी मारणे, पाय दुमडणे वगैरे अवस्था व्यायामादरम्यान कृपया टाळाव्या. कारण, यामुळे गुडघ्याचे नुकसान होऊ शकते.


नियमित फॉलोअप्स: डॉक्टरांची अपॉइंटमेंट कधीही चुकवू नका. वेदना असह्य असतील किंवा आणखी काही समस्या जाणवत असतील, तर त्यांच्याशी चर्चा करा.


वर नमूद केलेली सर्व काळजी घेतली, तर रुग्ण जलग गतीने दैनंदिन आयुष्य पूर्ववत सुरू करू शकेल. त्याचबरोबर आरोग्यपूर्ण आहार घेण्यास विसरू नका, कारण स्नायूंची शक्ती परत मिळवण्यात आरोग्यपूर्ण आहाराची मदत होते. 


गुडघ्याच्या सांध्यांमध्ये तीव्र वेदना, वाढलेली सूज, १०० अंशापेक्षा अधिक ताप असल्यास या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.