विशाल करोळे, झी मीडिया, औंरगाबाद : लॉकडाऊनमध्ये घरात अडकलेले लोक दिवस-रात्र टीव्ही आणि मोबाईल पाहात आहेत. रात्री जागून वेब सीरिज पाहण्याची सवय अनेकांना लागली आहे. लहान मुलेही यात मागे नाहीत. त्याचा परिणाम डोळ्यांवर होत आहे. कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम नावाचा प्रकार वाढत चालला आहे.


काय आहेत डोळ्यांच्या समस्या?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनमध्ये डोळ्यांच्या नेमक्या कोणत्या समस्या वाढल्या आहेत असं डॉक्टर सांगतात. डोळे लाल होणे, कोरडे होणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे दुखणे अशा समस्या लोकांना जाणवू लागल्या आहेत. हा सगळा लॉकडाऊनमध्ये बदललेल्या जीवनमानाचा साईडइफेक्ट आहे. हे सगळे वाढलेल्या स्क्रीन टाईममुळे आहे असे डॉक्टर सांगतात. नेत्रतज्ज्ञ राजीव मुंदडा म्हणाले, स्र्कीन टाईम वाढल्याने डोळे लाल पडतात, पाणी येतं, डोकेदुखी वाढत आहे, डोळे थकल्यासारखे वाटतात. अशी लक्षणं दिसत आहेत आणि या तक्रारींमध्ये वाढही होत आहे.


स्क्रीन टाईम म्हणजे काय?


स्क्रीन टाईम म्हणजे मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्ही पाहण्याचा वेळ. लॉकडाऊनमुळे लोक घरीच आहेत. घरी बसून वेळ घालवण्यासाठी लोक सतत मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्ही पाहात असतात. वर्क फ्रॉम होम म्हणजे घरी बसून काम करणे असो की मोबाईलवर खेळणं किंवा सोशल मीडियावर अँक्टिव्ह राहणे असो. लोकांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. याशिवाय मुलांचे क्लास आणि अभ्यासही आता मोबाईलवरच सुरु आहे. याशिवाय टीव्हीही दिवसातील बराच वेळ सुरुच असतो. त्यामुळे स्क्रीन टाईम कमालीचा वाढला आहे. त्याचा परिणाम अर्थातच डोळ्यांवर होऊ लागला आहे.


मनोरंजनासाठी किंवा कामासाठी अन्य कुठलेही साधन नसल्याने गॅझेट्स पाहणे जणू बंधनकारक झाले आहे. या वस्तू आता जीवनावश्यक बनल्या आहेत. पण त्याचा वापर करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.


काय काळजी घ्यावी?


लॉकडाऊन काळात डोळ्यांची समस्या वाढत असल्याने काय काळजी घ्यावी याबाबत नेत्रतज्ज्ञ डॉ. राजीव मुंदडा म्हणाले, टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर पाहताना पापण्यांची उघडझाप करत राहावी, लुब्रिकेटेड ड्रॉप डोळ्यात टाकावे, थोड्या थोड्या वेळाने दूर पाहण्याचा प्रयत्न करावा, प्रत्येक ३० मिनिटांनी ब्रेक घ्यावा आणि सतत टीव्ही, मोबाईल पाहू नये.


कोरोनाच्या काळात घरी निवांत राहायला मिळाले आहे. त्याता लाभ घेताना शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होणार नाहीत, याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचे आणि तुमच्या मुलांच्या आरोग्याचीही काळजी घ्या, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.