नवी दिल्ली : भारतात पहिल्यांदाच एका ५ महिन्यांच्या चिमुकलीवर लिव्हर प्रत्यारोपण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या शस्त्रक्रियेसाठी तब्बल १० तास लागले असून १८ तासांपासून डॉक्टरांची शस्त्रक्रियेसाठीची तयारी सुरू होती. १ वर्षाहून कमी वय असलेल्या मुलांचे लिव्हर प्रत्यारोपण करणे अतिशय कठीण असते. परंतु या ५ वर्षांच्या चिमुरडीवर डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या आईनेच लिव्हर देऊन मुलीला जीवनदान दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकातामध्ये राहणाऱ्या पाच महिन्यांच्या अरियानाला अचानक कावीळ होऊन उलट्या होण्यास सुरूवात झाली. अरियाची तपासणी केल्यानंतर तिच्या लिव्हरने काम पूर्णपणे बंद केल्याचे समोर आले. त्यामुळे लिव्हर प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नव्हता. दिल्लीतील मॅक्स रूग्णालयातील पीडियाट्रिक हेप्टोलॉजी डॉक्टर शरत वर्मा यांनी सांगितले की, अरियानाला वडिलांचे लिव्हर लावण्याचे ठरवण्यात आले होते. परंतु वडिलांचे लिव्हर मोठे असल्याने आईचे लिव्हर लावण्याचे ठरवले. 


याआधी अनेकदा लहान मुलांमध्ये लिव्हर प्रत्योरोपण करण्यात आले आहे. परंतु अरियाची घटना अतिशय निराळी आहे. लहान मुलांमध्ये लिव्हर फेलियर होण्याचे कारण इन्फेक्शन असते ज्यात सुरूवातीच्या लक्षणात काविळ होते. १ वर्षांहून लहान असणाऱ्या मुलांमध्ये लिव्हरसंबंधी समस्या निर्माण झाल्यास लगेचच समजते आणि त्यावर इलाज करण्यासाठी डॉक्टरांकडे पुरेसा वेळ असतो. परंतु अरियानाची गोष्ट वेगळी होती. अरियानाची तब्येत उत्तम होती परंतु अचानक एक दिवस तिला काविळ होऊन उलट्या सुरू झाल्या आणि डॉक्टरांनी लिव्हर फेलियर असल्याचे निदान केले. 


अरियानाची आई श्यानतानी डे यांनी अरियाना जन्माच्या वेळी एकदम स्वस्थ असल्याचे सांगितले. याआधी एकदा अरियानाला काविळ झाली होती परंतु ती पूर्णपणे बरी झाली होती. अचानक एक दिवस तिला ताप आला आणि डोळे पिवळे पडू लागले. त्यानंतर कोलकातातील रूग्णालयात भरती करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी ती काही दिवसांचीच सोबती असल्याचे सांगितले. परंतु तुम्हाला प्रयत्न करायचे असल्यास मुलीला दिल्लीतील मॅक्स रूग्णालयात डॉ. सुभाष गुप्ता यांच्याकडे जाण्यास सांगितले असल्याचे अरियानाची आई श्यानतानी डे यांनी सांगितले.


डॉ. सुभाष गुप्ता यांनी अरियानावर यशस्वी लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. ३० वर्षांच्या एका व्यक्तीचे लिव्हर ५ महिन्यांच्या मुलीला लावणे एक मोठे आव्हान असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी माझ्या मुलीला जीवनदान दिले आहे. तिला एक नवीन आयुष्य मिळाले असल्याचे अरियाने वडिल अर्जित डे यांनी सांगितले. आज डॉक्टर नसते तर माझी मुलगीही वाचू शकली नसल्याचे त्यांनी सांगितले असून अरियानानेही मोठे होऊन सर्जन बनण्याची ईच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.