COVID 19 Sub Variant JN.1: देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसतोय. कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट JN.1 च्या आतापर्यंत 21 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. यावेळी गोवा, केरळ आणि महाराष्ट्रामध्ये नव्या व्हायरसची एन्ट्री पहायला मिळाली आहे. मुख्य म्हणजे या सब व्हेरिएंटचे आतापर्यंत गोव्यामध्ये सर्वाधिक रूग्ण सापडले आहेत. ही संख्या 19 वर असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. 


सतर्क राहण्याचे आदेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र आणि केरळ मध्ये या सब व्हेरिएंटचा एक-एक रूग्ण आढळून आला आहे. JN.1, कोरोनाच्या Omicron प्रकाराचा सब व्हेरिएंट असल्यातं समोर आलंय. या सब व्हेरिएंटने गेल्या काही आठवड्यांमध्ये सर्वात वेगाने पसरणाऱ्या व्हायरसपैकी एक बनला आहे. 


देशभरात वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये, NITI आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के पॉल यांनी बुधवारी सांगितलं की, घाबरण्याची गरज नाहीये. भारतातील शास्त्रज्ञ नवीन प्रकारावर बारीक लक्ष ठेवून आहेत. यावेळी चाचणी वाढवणं आणि त्यांची पाळत ठेवणारी यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला जातोय.  देशभरात कोविडची प्रकरणं वाढत असल्याने केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्यास सांगितलंय. 


केरळमध्ये 3 रूग्णांचा मृत्यू


बुधवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना संसर्गाची 614 नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. ही आकडेवारी 21 मे नंतरची सर्वाधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सक्रिय रुग्णांची संख्या 2,311 वर पोहोचली असून केरळमध्ये गेल्या 24 तासांत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंच्या संख्येमुळे मृतांचा आकडा 5 लाख 33 हजार 321 वर पोहोचला आहे. 


वेगाने पसरतोय कोरोनाचा नवा स्ट्रेन


जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) JN.1 सब व्हेरिएंटबद्दल माहिती देताना म्हटलंय की, तपासणीत असं दिसून आलंय की, तो इतर प्रकारांपेक्षा अधिक सहजपणे पसरतो. जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे विषाणूशास्त्रज्ञ अँड्र्यू पेकोस यांच्या म्हणण्यानुसार, जेएन.1ला फारसा धोका नाही. JN.1 पूर्वी त्याच्या मूळ वंशाच्या BA.2.86 चा भाग म्हणून वर्गीकृत करण्यात आलं होतं. परंतु WHO ने आता त्याचं वेगळं रूप म्हणून वर्गीकरण केलंय.