Influenza H3N2 Symptoms in Marathi: कोरोनाचं संकट निवळल्यानंतर आता कुठे देशाचा गाडा हळूहळू पूर्वपदावर येतोय. अशातच देशात तीन-तीन व्हायरसनी धुमाकूळ घातलाय. यात सर्वात घातक ठरतोय तो H3N2 व्हायरस. या व्हायरसमुळे कित्येकांना सर्दी, ताप, खोकला झालाय. सुरूवातीला हा व्हायरस सर्दी-तापापुरताच मर्यादित होता. मात्र आता या व्हायरसनं दोन जणांचा बळी घेतलाय. कर्नाटकात H3N2 मुळे दोघांचा मृत्यू झालाय. देशात आतापर्यंत या व्हायरसची 90 जणांना लागण झाली आहे. कोरोनाप्रमाणेच H3N2चं म्युटेशन होत असल्यानं आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. 


H3N2 ची लक्षणं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ताप येणं, घशात खवखव, सर्दी, नाकातून सतत पाणी येणं, अंगदुखी, थकवा ही या आजाराची लक्षणं आहेत. काही रूग्णांना डोकेदुखी आणि डिहायड्रेशनचा त्रास जाणवतोय. H3N2ची लागण झालेल्या रूग्णांना 100 डिग्रीपेक्षा जास्त ताप येतो. 4 ते 5 दिवसांपासून ते महिनाभर खोकला राहू शकतो. 


तज्ज्ञांच्या मते फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात H3N2 इन्फ्लूएन्झा व्हायरस सक्रिय होतो. मात्र यावेळी H3N2 सोबत एडिनो व्हायरसरही वेगानं पसरतो. ज्याचा प्रभाव लहान मुलांवर दिसून येतोय. 


ट्रिपल व्हायरसमुळे देशात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलंय. मात्र योग्य ती काळजी घेतल्यास या व्हायसरपासून बचावही करता येतो. ICMRनं यासाठी गाईडलाईन देखील जारी केलीय. 


ट्रिपल व्हायरसपासून कसा बचाव कराल?


  • गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा

  • सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा

  • साबण, सॅनिटायझरचा नियमित वापर करा

  • शिंकताना रूमालाचा वापर करा

  • डोळे आणि नाकाला सारखा सारखा स्पर्श करू नका

  • जेवणात द्रवरूप पदार्थांचं प्रमाण अधिक ठेवा

  • पाणी तसंच फळांचा रस घ्या


ताप आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं घ्या


H3N2चं संकट छोटं वाटत असलं तरी या व्हायरसला हलक्यात घेऊ नका. कारण देशात हा व्हायरस झपाट्यानं पसरतोय. तुम्ही सतर्क राहिलात तर कोरोनाप्रमाणे या व्हायरसचा धोका टाळणं फार कठीण गोष्ट नाही.