मुंबई :  उन्हाळ्याच्या दिवसात मोसंबीचा आंबट रस अमृतापेक्षा कमी नाही. मोसंबीत व्हिटॉमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर त्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असतात. यामुळे आरोग्यासाठी मोसंबीचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो. जाणून घेऊया मोसंबीच्या रसाचे फायदे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

#1. हिरड्यातून रक्त येण्याची समस्या ही व्हिटॉमिन सी च्या कमतरतेमुळे उद्भवते. मोसंबीच्या रसात व्हिटॉमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने या समस्येवर अतिशय फायदेशीर ठरतो.


#2. पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मोसंबीचा रस अतिशय उपयुक्त ठरतो. त्यातील आंबट-गोडपणामुळे आणि अॅसिडमुळे मोसंबीचा रस पचनक्रियेत मदत करतो. त्याचबरोबर पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मोसंबीचा रस फायदेशीर ठरतो.


#3. मोसंबीचा रस मधुमेहींसाठीही उपयुक्त ठरतो. मधुमेहींनी २ चमचे मोसंबीचा रस, ४ चमचे आवळ्याचा रस आणि १ चमचा मध रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्या आणि फरक पहा.


#4. रोज मोसंबीचा रस प्यायल्याने रक्तसंचार सुरळीत होतो. रोगप्रतिकराक क्षमता वाढते.


#5. मोसंबीच्या रसात कॅलरिज खूप कमी असतात. त्यमुळे वजन कमी करण्यासही मदत होते. मोसंबीचा रस मध घालून घेतल्यास वजनवाढीची समस्या आटोक्यात येते.


#6. गर्भवती महिलांसाठी मोसंबीचा रस खूप फायदेशीर आहे. याचा फायदा आई व गर्भातील बाळ दोघांना होतो.


#7. डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी देखील मोसंबीचा रस फायदेशीर ठरतो. पाण्यात मोसंबीच्या रसाचे काही थेंब घालून डोळे धुतल्याने डोळ्यांच्या इंफेक्शनपासून संरक्षण होते.


#8. मोसंबीचा रस चेहऱ्याला लावल्याने काळे डाग, पिंपल्स दूर होण्यास मदत होते. मोसंबीच्या रसाने रक्त शुद्ध होते. परिणामी त्वचेचा पोत सुधारतो. त्वचा उजळ होते.


#9. मोसंबीचा रस पाण्यात घालून अंघोळ केल्याने घामाची दुर्गंधी यांसारख्या समस्येंपासून सुटका होते.


#10. मोसंबीच्या रसामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास आणि रक्तदाबाची समस्या दूर होण्यास मदत होते.


#11. त्यातील व्हिटॉमिन सी  मुळे सर्दी-खोकल्याची समस्याही दूर होते.


#12. मोसंबीच्या रसात कॉपर असते. त्यामुळे केसांचे कंडिशनिंग करण्यासाठी मोसंबीचा रस उपयुक्त ठरतो. मोसंबीच्या रसाने केस धुतल्याने केस मुलायम, चमकदार होतात.


#13. मोसंबीच्या रसाने ओठांना मालिश केल्यास ओठ फाटण्याची समस्या कमी होते.