दिल्ली : काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णांमध्ये घट होताना दिसतेय. परिस्थिती आटोक्यात येत असल्याचं चित्र असलं तरीही सावधगिरी बाळगली पाहिजे असं  केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री म्हणाले, देशातील बहुतांश राज्यांमध्ये गेल्या दोन आठवड्यांत कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये घट झालीये. पण असं असूनही, अजूनही सावध राहण्याची गरज आहे. कोरोना अजून पूर्णपणे गेलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया कोरोनाच्या परिस्थितीसंदर्भात देशातील 5 पूर्वेकडील राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत वर्च्युवर बैठक घेतली. या बैठकीत ओडिशा, बिहार, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगालचे आरोग्य मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.


मांडविया यांनी पाच राज्यांना दर दिवसी पॉझिटीव्हीटी रेटचं निरीक्षण करण्याचे आणि आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या मृत्यूंवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला. त्याचप्रमामे ऑक्सिजन, ICU बेड आणि व्हेंटिलेटरची पुरेशी व्यवस्था असल्याची खात्री करण्यास सांगण्यात आलं आहे.


पूर्वेकडील राज्यांना 15-17 वयोगटातील किशोरवयीन मुलांचं लसीकरण जलद करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात आला आहे. 


आरोग्यमंत्री मांडविया म्हणाले, प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ई-संजीवनी सारखी दूरसंचार केंद्रं स्थापन करण्याचा विचार करा. त्यांनी संबंधित मंत्री आणि अधिकार्‍यांना त्यांच्या राज्यांमधील रुग्णालयाच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि व्हायरसची साखळी तोडण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचं आवाहन करण्यात आलंय.