Eye Flu : नागरिकांनो, तुमचे डोळे सांभाळा. तुमचे डोळे लाल झाले नाहीयत ना, हे तपासून पाहा. हे आम्ही अतिशय गांभीर्यानं सांगतोय कारण सध्या आय फ्लू (Eye Flu) म्हणजेच डोळ्यांचा आजार थैमान घालतोय. अख्ख्या देशात सध्या आय फ्लूचं संकट आहे. पावसाळ्यात (Monsoon)  डोळ्यांचे आजार वेगाने पसरत आहे. मुंबई, दिल्लीत आय फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. कंजक्टिवाइटिस (Conjunctivitis) हा डोळ्यांचा एक आजार आहे. यात डोळे लाल किंवा गुलाबी होतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Eye Flu ची लक्षणं (Symptoms)
डोळ्यांवर सूज येणं, डोळे लाल होणं 
डोळ्यातून पांढऱ्या रंगाचा डिस्चार्ज 
डोळ्यांना खाज येणं ही आय फ्लूची किंवा डोळे येण्याची लक्षणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे डोळे आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ नका. थोडी खबरदारी घेतली तर आय फ्लूपासून वाचणं शक्य आहे. 


काय काळजी घ्यावी?
चेहऱ्याला सारखा हात लावू नका
डोळे पुसायला टिश्यू पेपर वापरावा
30 सेकंद साबणानं हात धुवावेत
गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं
रुग्णांनी चष्म्याचा वापर करावा


डोळे आलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांत पाहिल्यानं हा आजार होत नाही. पावसाळ्यातलं ओलं आणि दमट वातावरण डोळ्यांमधले बॅक्टेरिया वाढण्यासाठी पोषक असतं. त्यामुळे पावसाळ्यात आय फ्लूचा धोका वाढतो. अजून दोन महिने पावसाचा मुक्काम आहे. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत खबरदारी घ्या. डोळे आलेच तर स्वतः घरी उपचार करू नका, डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.


मुंबईत साथीचे आजार
मुंबईला साथीच्या आजाराने विळखा घातला आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा झपाट्याने फैलाव होत असून यात गॅस्ट्रो (Gastro), मलेरिया (Malaria) आणि डेंग्युचे (Dengue) सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबई मनपा दिलेल्या आकडेवारीनुसार 1 ते 16 जुलैपर्यंत मलेरियाचे 355, डेंग्यूचे 264 तर लेप्टोचे 104 रुण आढळले आहेत. तर गॅस्ट्रोचं 932 रुग्णांमध्ये निदान झाले आहे. 23 जून रोजी नायर रुग्णालयात 38 वर्षीय महिलेचा लेप्टोची लागण होऊन मृत्यू झाला. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचं प्रमाण सर्वाधिक आहे. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे होणारी अस्वच्छता आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्याने पोटाचे विकार झपाट्याने वाढत आहेत. यांमध्येही बालरुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असून उलट्या, जुलाब आणि अपचन या तक्रारी रुग्णांकडून केल्या जात आहेत. गेल्या दोन आठवड्यात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचं डॉक्टर्स सांगतात.