दिवसातून प्रत्येकानं किती साखर खावी? आहारतज्ज्ञांचं म्हणणं ऐकून डोकंच चक्रावेल
Health News : आहाराच्या चांगल्या सवयी अंगी बाणवत असतानाच नकळतपणे आपण काही गोष्टी, काही पदार्थांना जाणीवपूर्वक डावलतो. थोडक्यात या पदार्थांना खलनायकी नजरेनं पाहतो. हे कितपत योग्य?
Health News : गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या बाबतीत प्रत्येकजण सजग असल्याचं पाहायला मिळत आहे. वजन वाढण्यापासून शरीरामध्ये होणाऱ्या लहानमोठ्या बदलापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये चिंतेचा सूर दिसतोय आणि यात वावगं काहीच नाही. हो, पण आरोग्याप्रती सतर्क असणारे तुम्ही आम्ही नेमके योग्य मार्गावर आहोत का? याची पडताळणी एकदा नक्की करा. कारण, इथंच आपल्या भरपूर चुका होत आहेत.
सोशल मीडिया आणि इंटरनेटवर उपलब्ध असणारी माहिती आणि त्यामुळं घेतले जाणारे निर्णय अनेकदा गरजेचे असतातच असं नाही. पण, या तांत्रिक भीतीमुळं नाईलाजानं का असेना, हे निर्णय घेतले जातात. सहसा भात आणि साखरे या निर्णयांना बळी पडतात. तुम्हीही असा निर्णय घेतलाय का? मग आता आहारतज्ज्ञ काय म्हणतायत ते जाणूनच घ्या. (Health News how much sugar intake is safe?)
हल्लीच सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ (Rujuta Divekar) ऋजुता दिवेकरनं अनेकांचे गैरसमज दूर करणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जिथं ती साखरेविषयी बोलताना दिसत आहे. साखरेमुळं वजन वाढतं, त्वचाविकार जडतात, साखरेमुळं कर्करोग होतो असं आपल्या कानांवर सतत येत आहे. त्यात मधुमेहसुद्धा मागे नाहीच, असं म्हणताना चहा आणि कॉफीमधून साखर न घेणाऱ्या किंवा साखरेला पर्याय शोधणाऱ्या मंडळींचाही ऋजुतानं उल्लेख केला.
विज्ञान काय सांगतं?
हल्लीच जागतिक आरोग्य संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या एका निरीक्षणाचा संदर्भ देत तिनं साखरेला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या पदार्थांबाबतची मार्गदर्शक तत्वं पुन्हा अधोरेखित केली. जिथं या पर्यायी मार्गांचा वापर वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत कोणताही फायदा करत नसल्याचं तिनं स्पष्ट केलं. यावेळी या पर्यायांमुळं होणाऱ्या रोगांचा धोकाही तिनं पुन्हा सर्वांसमोर मांडला.
WHO चाच संदर्भ देत जी मंडळी आंबा किंवा इतर फळं गोड आहेत म्हणून त्यांचं सेवन थांबवत आहेत त्यांनी कृपया असं करु नका असा आर्जवी सूर तिनं आळवला.
ऋतुनुसार येणारी फळं नक्की खा. दिवसभरातील आहारातून जास्तीची साखर खाणं कमी करा. आकडेवारीनुसार सांगावं तर हे प्रमाण तुमच्या रोजच्या कॅलरींच्या प्रमाणाच्या 10 टक्के असावं. थोडक्यात दिवसातून 6 ते 12 लहान चमचे साखर तुम्ही खाऊ शकता, असं तिनं इथं स्पष्ट केलं.
हेसुद्धा वाचा : Corona पुन्हा थैमान घालणार; एका आठवड्यात 6.5 कोटी रुग्ण आढळण्याची भीती
थोडक्यात तिच्या म्हणण्यानुसार घरगुती गोडाचे पदार्थ खाताना इथून पुढं तुम्ही नाकं मुरडण्याची गरज नाही. त्याऐवजी रेडिमेड केचअप, ज्युस, कुकीज, चॉकलेट्स, बिस्कीटं या पदार्थांच्या सेवनावर आळा घाला. नैसर्गिकरित्या विविध पदार्थांमधून शरीराला मिळणारी साखर खाणं थांबवू नका. त्यामुळं चुकीच्या सवयींनी स्वत:चीच फसवणूक करण्यापेक्षा आरोग्यदायी जीवनाच्या दिशेनं वाटचाल करा.