पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी, लहान मुलांमध्ये कॅन्सरचा वाढता धोका... धक्कादायक आकडेवारी
Cancer in Children: लहान मुलांच्या पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी, लहान वयाच्या मुलांमध्ये कॅन्सरचा धोका वाढत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. जगातील एकूण कॅन्सर रुग्णांपैकी 4 टक्के लहान मुलं असल्याचं समोर आलं आहे.
पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : कॅन्सरचा (Cancer) विळखा आता तरुण आणि लहान मुलांसाठीही जीवघेणा ठरतोय. सध्याच्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) भारतात लहान मुलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय. भारतासह जगभरातील 200 देशांचा अलिकडेच अभ्यास करण्यात आला. त्या अहवालामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात.. अगदीच चार वर्षांच्या मुलांनाही जीवघेण्या ब्लड कॅन्सरची (Blood Cancer) बाधा झाल्याचं आढळलं. त्यामुळं पालकांच्या काळजाचा ठोकाच चुकलाय.
लहान मुलांना कॅन्सरचा विळखा
2012 ते 2019 या काळात भारतात कॅन्सर रुग्णांची संख्या 6.10 लाखाहून अधिक होती. त्यामध्ये 14 वर्षांखालील 24,268 लहान मुलांचा समावेश होता. जगभरात 1990 ते 2019 या काळात कॅन्सर रुग्णांची संख्या 18.2 कोटींवरून 32.6 कोटी एवढी वाढली. जगातील कॅन्सर रुग्णांपैकी तब्बल 4 टक्के लहान मुलं आहेत. दरवर्षी 19 वर्षांखालील सुमारे 4 लाख मुलं कॅन्सरची शिकार होतात. लहान मुलांमध्ये ल्युकेमिया, ब्रेन कॅन्सर, लिम्फोमस, सॉलिड ट्युमरचं प्रमाण वाढलंय. वेळेवर उपचार होत नसल्यानं अनेक मुलांचा कॅन्सरनं मृत्यूही होतोय
भारतात कॅन्सरमुळं होणाऱ्या मृत्यूमध्ये 28%नी वाढ झालीय, असंही या आकडेवारीत नमुद करण्यात आलंय.
भारतात कॅन्सरचा धोका वाढण्याची कारणं काय, त्यावर नजर टाकूया...
धूम्रपान, तंबाखू, दारू यामुळं तरुणांमध्ये कॅन्सरचा धोका वाढलाय. तर जंक फूड, स्थूलपणा, शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता आणि शारिरीक कसरतींचा अभाव यामुळं लहान मुलंही कॅन्सरची शिकार ठरतायत. वाढतं प्रदूषण हे देखील कॅन्सरवाढीचं प्रमुख कारण मानलं जातंय. हवेतील सल्फर, कॅडिमियम, कार्सिनोजेन हे घटक कॅन्सरवाढीला पोषक ठरतायत
कॅन्सरमुळं भारताचं भविष्यच आता धोक्यात आलंय. ते सावरणं आता पालकांच्या हातात आहे.. तुमच्या मुलांना कॅन्सरपासून वाचवायचं असेल तर त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि लाईफस्टाईल आतापासूनच बदला.
कॅन्सर हा असा आजार आहे ज्याची प्राथमिक लक्षणे सुरुवातीला आढळत नाहीत. मात्र जेव्हा आढळतात तेव्हा त्या आजाराने दुसरी किंवा तिसरी स्टेज गाठलेली असते आणि तो पर्यत उपचाराची योग्य वेळ निघून गेलेली असते. कॅन्सरचे छोटी छोटी लक्षण तुम्ही घरातच ओळखू शकता आणि या लक्षणांना दुर्लक्ष न करता वेळेवर डॉक्टरांकडून उपचार करा.
1. अचानक वजन कमी होणे.
2. तणाव निर्माण होणे.
3. शरीरातील कोणताही भाग चार आठवड्यापेक्षा जास्त दुखणे.
4. जास्त खोकला होणे.
5. आवाजात बदल होणे.
6. खूप घाम येणे.
7. सलग ताप येणे.
8 जेवण गिळताना त्रास होणे.
9. शरीरात गाठी तयार होणे.