मुंबई : पावसाळ्याच्या दिवसात आपण हमखास नवीन चप्पल घेतो. अनेकदा नवी चप्पल त्वचेला त्रासदायक ठरते. पावसात पाणी आणि त्वचेसोबत सतत घर्षण झाल्याने त्रास होतो. म्हणूनच नव्या चप्पलमुळे होणारा शू बाईटचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की लक्षात ठेवा. 


खोबरेल तेल –


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चप्पल चावल्यावर खोबरेल तेल लावतात हे बऱ्याच जणांना ठाऊक असेल. जखमेवर खोबरेल तेल लावल्याने त्वचा मॉयश्चराइज होऊन जखम बरी होण्यास मदत होते व जंतूसंसर्ग होण्यापासूनही बचाव होतो. तसेच नवीन चप्पल वापरण्याअगोदर तिला खोबरेल तेल लावल्यास ती मऊ होते व त्रास होत नाही.


टूथपेस्ट –


चप्पल चावल्यामुळे येणारा फोड आणि खाज यांपासून टूथपेस्टने कसा आराम मिळेल, याचे आश्चर्य वाटले ना? टूथपेस्टमध्ये जखम बरी होण्यासाठी आवश्यक बेकींग सोडा, हायड्रोजन पेरॉक्साइड आणि मेन्थॉल असते. रात्री झोपताना जखमेवर थोडीशी टूथपेस्ट लावावी व सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने धुवावी. त्यानंतर त्यावर पेट्रोलियम जेली लावावी. यासाठी जेल-बेस्ड टूथपेस्ट लावू नये.


तांदळाचे पीठ –


चप्पल चावल्यास तांदळाच्या पिठानेही झटकन उपाय करता येतो. यामुळे शुष्क त्वचा निघून जाते, तसेच दाह आणि खाजही कमी होण्यास मदत होते. तांदळाच्या पिठामध्ये पाणी मिसळून घट्ट पेस्ट करावी. ही पेस्ट जखमेवर लावावी व सुकल्यावर पाण्याने धुवावी. जखम बरी होईपर्यंत हा उपाय करावा.


कोरफड –


कोरफडीमुळे जळजळणे, खाज सुटणे आणि वेदनांपासून आराम मिळतो. कोरफडाच्या गरातील दाहशामक क्षमतेमुळे जखम लवकर बरी होऊन जंतूसंसर्ग होण्यापासून बचाव होतो. कोरफडाचा गर काढून जखमेवर लावावा. सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवावा. असे 3-4 दिवस सकाळ – संध्याकाळ  करावे.


हळद आणि कडुलिंबाची पाने –


हळद ही जंतूनाशक आणि कडुलिंबाची पाने दाहशामक असल्याने यामुळे   चप्पल चावल्यामुळे जखम होणे, खाज सुटणे किंवा सुजणे यांपासून आराम मिळतो. कडूलिंबाची पाने बारीक वाटून त्यात हळद मिसळून घट्ट पेस्ट करावी. ही पेस्ट जखमेवर लावून 20 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवावी. जखम लवकर बरी होण्यासाठी ही पेस्ट दिवसातून दोनदा लावावी.