Omicron मधून बरं झाल्यानंतर शरीरात इम्युनिटी किती दिवस राहते?
अजूनही ओमायक्रॉनच्या प्रकरणांमध्ये गंभीर लक्षणं समोर आलेली नाहीत.
दिल्ली : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन भारतासह अनेक मोठ्या देशांमध्ये पसरतोय. या नवीन व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग पूर्वीच्या डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत खूप जास्त असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. मात्र अजूनही ओमायक्रॉनच्या प्रकरणांमध्ये गंभीर लक्षणं समोर आलेली नाहीत. तसंच ओमायक्रॉनमधून बरं होणाऱ्यांची प्रतिकारशक्तीही चांगली असल्याचं दिसून आलंय. ओमायक्रॉनवर मात केल्यानंतर ही प्रतिकारशक्ती लोकांच्या शरीरात दीर्घकाळ टिकू शकतं, असं तज्ज्ञांचे मत आहे.
एका नव्या अहवालानुसार, 88 टक्के प्रकरणांमध्ये ओमायक्रॉन संसर्गाद्वारे तयार होणाऱ्या कोरोना विषाणू अँटीबॉडीज शरीरात कमीत कमी सहा महिने राहतात. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, या अँटीबॉडीज कोरोनाच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना संरक्षण देतात. सहा महिन्यांनंतर, या अंटीबॉडीजचा प्रोटेक्शन रेट 74 टक्क्यांपर्यंत घसरतो.
ईस्ट अँग्लिया विद्यापीठातील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ प्रोफेसर पॉल हंटर म्हणाले, "ओमायक्रॉन किंवा इतर कोणताही व्हेरिएंट तुमची प्रतिकारशक्ती सुधारतात. मग ही प्रतिकारशक्ती त्या व्हेरिएंटविरुद्ध अधिक प्रभावी होते. मात्र त्यानंतरही ते इतर लोकांना संक्रमित करतात."
बाधत व्यक्तींवर केलेल्या अभ्यासानुसार, व्हायरसच्या संपर्कात आलेल्या रुग्णांच्या शरीरात अँटी-एन अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत आणि त्यामुळे बरं झाल्यानंतर त्यांच्या शरीरावर व्हायरसचा विशेष प्रभाव पडत नसल्याचं समोर आलं आहे.
ओमायक्रॉन सारख्या जास्त वेळा म्युटेशन होणाऱ्या व्हेरिएंटविरूद्ध लस कमी प्रभावी असल्याचं आढळून आलं आहे. दरम्यान बूस्टर शॉटने या व्हेरिएंट विरूद्ध मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळतं.
साउथॅम्प्टन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या सेंटर फॉर क्लिनिकल रिसर्चचे प्रोफेसर सोल फॉस्ट यांनी सांगितलं की, आमच्या अभ्यासात सर्व लसी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रभावी असल्याचे दिसून आलंय.