Eye Care: मधुमेहाचा तुमच्या डोळ्यांवर परिणाम होतोय का? कसं ओळखायचं हे जाणून घ्या
Diabetes Effect on Eyes: लक्षणे लवकर ओळखणे आणि डोळ्यांची नियमित तपासणी करणे मधुमेहींसाठी आवश्यक आहे.
मधुमेहाचा अनेक अवयवांवर परिणाम होतो. डोळेही त्याला अपवाद नाहीत आणि भारतात ही वेगाने वाढत जाणारी आरोग्य समस्या आहे. याची लक्षणे लवकर ओळखणे आणि डोळ्यांची नियमित तपासणी करणे मधुमेहींसाठी आवश्यक आहे, जेणेकरून संभाव्य गुंतागुंत टाळता येऊ शकेल. मधुमेहाचा डोळ्यांवर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो आणि त्याला प्रतिबंध कशा प्रकारे करता येऊ शकतो याचे मार्ग डॉ. अग्रवालस् डोळ्यांचे हॉस्पिटल, पिंपरी चिंचवड, पुणे येथील मोतीबिंदू सर्जन, सामान्य नेत्ररोग, मेडिकल रेटिना सेक्शनचे डॉ. सोनल इरोळे यांच्याकडून जाणून घेऊयात.
मधुमेहामुळे डोळ्यांच्या अनेक ऊतींना नुकसान पोहोचू शकते. परिणामी, डायबेटिक रेटिनोपथी किंवा मोतिबिंदू यासारखे आजार उद्भवू शकतात.
1. मोतिबिंदू
मधुमेह नसलेल्यांच्या तुलनेने मधुमेहींमध्ये मोतिबिंदू होण्याचे प्रमाण अधिक असते. या मोतिबिंदूची तीव्रताही जलद वेगाने वाढते. मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करताना संसर्गाची जोखीम अधिक असल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी असेल तेव्हाच ही शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात येतो.
2. डायबेटिक रेटिनोपथी
मधुमेहामध्ये डोळ्यातील रेटिना या भागावर सर्वाधिक परिणाम होतो. रेटिनामध्ये होणारा रक्तस्त्राव, रेटिनाच्या ऊतींना सूज येणे आणि नाजूक रक्तवाहिन्यांची वाढ होणे, ज्यातून रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. ही लक्षणे उच्च रक्तशर्करेमुळे लहान रक्तवाहिन्यांना होणाऱ्या नुकसानाची चिन्हे आहेत. रेटिनाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला तरी तुमची दृष्टी सामान्य राहू शकत असल्याने मधुमेहींना त्यांच्या रेटिनामधील बदल लक्षात येईलच, असे नाही.
'या' लक्षणांवर लक्ष ठेवा
दृष्टी धुसर होणे : रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने लेन्सवर तात्पुरता परिणाम होऊ शकतो. परिणामी, दृष्टी धुसर होऊ शकते किंवा शिफ्टिंग व्हिजन (जवळच्या किंवा लांबच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करता न येणे) होऊ शकते.
रात्री स्पष्ट न दिसणे : कमी प्रकाश असेल तर मधुमेहींना स्पष्ट दिसत नाही. रेटिनामध्ये बदल होत असल्याचे हे लक्षण आहे.
डाग किंवा फ्लोटर्स : तुमच्या दृष्टीमध्ये सूक्ष्म काळे डाग किंवा 'फ्लोटर्स' दिसत असतील तर डायबेटिक रेटिनोपथीमुळे रक्तस्त्राव होत असल्याचे हे लक्षण असू शकते.
दृष्टीमध्ये काळे किंवा रिकामे भाग असणे : काही भागांतून न दिसणे किंवा डार्क स्पॉट्स जाणवत असेल तर रेटिनाला गंभीर स्वरुपाची इजा झाल्याचे हे लक्षण आहे.
धुसर किंवा रंग मलूल दिसणे : मधुमेहामुळे रेटिनाला नुकसान पोहोचू शकते. काही वेळा रंग मलूल किंवा फिके दिसतात.
डोळ्याला थकवा येणे किंवा ताण जाणवणे : डोळ्यांवर सतत ताण येणे किंवा डोळ्यांना थकवा आल्यासारखे वाटणे, विशेषतः वाचताना किंवा एखाद्या वस्तूवर लक्ष केंद्रीत करताना असे वाटत असल्यास ही सुरुवातीची चेतावनी असू शकते.
डोळ्यांमध्ये वेदना किंवा दाब येणे : डोळ्यांमध्ये वेदना होणे, डोळे लालसर होणे किंवा डोळ्यांवर दाब येणे ही ग्लाउकोमा असल्याची लक्षणे आहेत. मधुमेहींना याचा धोका जास्त असतो.
डोळ्यांची नियमित तपासणी करण्याचे महत्त्व
मधुमेहींनी मधुमेहाचे निदान झाल्या-झाल्या लवकरात लवकर रेटिनाची तपासणी करून घ्यावी.
दृष्टीसंदर्भात कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी दर वर्षी रेटिनाची तपासणी करणे हिताचे राहील.
रेटिनामध्ये काही बदल झाल्याचे आढळून आले तर अधिक नियमितपणे तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून या बदलाच्या तीव्रतेवर लक्ष ठेवता येईल आणि वेळेवर उपचार करता येतील.