लहान मुलांमधील इंटरनेटचं व्यसन दूर करणार `हा` उपाय
आजकाल लहान मुलांना इंटरनेटचं व्यसन लागलं आहे.
मुंबई : आजकाल लहान मुलांना इंटरनेटचं व्यसन लागलं आहे. इंटरनेटच्या विळख्यात अडकल्याने आजकाल मुलांचाही बराच वेळ फेसबुक, इंस्टाग्रामवर जातो. अमेरिकेत किशोरवयीन आणि युवकांमधील मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी खास क्लिनिक्स सुरू करण्यात आली आहेत. यामुळे मोबाईल फोनचं व्यसन सोडवण्यास मदत होत आहे.
सॅन फ्रॅन्सिकोपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या एका हवेलीमध्ये क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. हे क्लिनिक एका टेकडीच्या उंचावर हिरवळीवर आहे. या क्लिनिकमध्ये सुमारे 45 दिवस उपचार केले जातात. येथे मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेटवर बंदी आहे. संगणकाचाही उपयोग केवळ क्लासरूममध्ये होतो. या वापरावरही शिक्षक आणि मानसोपचारतज्ञ लक्ष ठेवून असतात.
क्लिनिकमध्ये रूग्णांवर खास थेरपी दिली जाते. या थेरपीद्वारा मुलांचा अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता सुधारते. ऑफलाईन जगात मित्रपरिवार, आजूबाजूच्या व्यक्तींसोबत अधिक वेळ घालवला जातो. थेरपीसोबतच मुलांमधील कौशल्यविकासाकडे अधिक लक्ष दिले जाते. व्यायामाकडे अधिक लक्ष दिले जाते.
योगाभ्यास आवश्यक
आत्मिक शांती मिळवण्यासाठी अध्यात्माची मदत होते. लहान मुलांमध्ये योगासनाची आवड निर्माण केली जाते. मुलांचा दिनक्रम अशाप्रकारे बनवल्याने हळूहळू ते ऑफलाईन जगात रूळायला मदत होते. अमेरिकेमध्ये याला मानसिक आजार समजले जात नसले तरीही ऑस्ट्रेलिया, चीन, इटली, जापानमध्ये इंटरनेटचं व्यसन हा मानसिक आजार आहेत. तर दक्षिण कोरियात या आजारापासून सुटका मिळवण्यासाठी खास सरकारी रूग्णालयात उपचार उपलब्ध करून दिले जातात.
कसं ओळखाल इंटरनेटच्या व्यसनाचं लक्षणं
इंटरनेट उपलब्ध नसल्यास मुलांना राग येणं,
सोशल मीडियाचा लपून छपून वापर करून त्याबाबत खोटं बोलणं,
कुटुंबातील व्यक्तींशी संवाद कमी होणं,
मुलांमध्ये अशाप्रकारची व्यसन निर्माण झाल्यास त्यांच्या इंटरनेटच्या वापरावर नियंत्रण ठेवणं हे गरजेचे आहे.